पुणे: पुण्यामधल्या भोर तालुक्यातील कापूरहोळ इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं चक्क एटीएमची प्रेतयात्रा काढून नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. नोटाबंदीचा निर्णय सपशेल अपयशी ठरल्यानं शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गाला याचा सर्वात मोठा फटका बसल्याचा दावा यावेळी केला गेला आहे. या मोर्चात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील सहभागी होत्या.
दरम्यान, नोटबंदीविरोधात राष्ट्रवादीनं राज्यभरात आंदोलन छेडलं आहे. पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं. तर तिकडे औरंगाबादमध्येही माजी मंत्री फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
पुण्यात महात्मा फुले मंडईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.