पुणे: ‘पुण्यात माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसताना मग माझ्याच सभेला परवानगी का नाकारली जाते? मलाच नोटीस का बजावली जाते? हिम्मत असेल तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांना नोटीसा देऊन दाखवा. पुणे ही कुणा एकाची संपत्ती नाही. तर पुणे हे संपूर्ण देशाचं आहे. त्यामुळे माझ्या सहनशक्तीचा तुम्ही अंत पाहू नका.’ अशा शब्दात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुण्यातील सभेत सरकारवर हल्लाबोल केला.


‘मी जर चुकीचं बोलत असेल तर माझ्यावर गुन्हे नोंदवा, मला अटक करा. हवं तर माझ्यावर गोळ्या झाडा. पण जर मी चुकीचं बोलत नसेल तर नोटीस देऊन माझा अपमान तरी का करता?’  असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.

‘पुणे कुणा एकाची संपत्ती नाही’

दरम्यान, ओवेसींनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ‘घटनेनं मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. मला माझे विचार मांडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पुणे ही कुणा एकाची संपत्ती नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे तोवर गरीबांचं कामं तुमच्याकडून करुन घेईनच. त्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही.’ असंही ओवेसी म्हणाले.

‘माझे विचार चूक की बरोबर हे जनता ठरवेल’

मी मागच्या वर्षी पुण्यात सभा घेतली. त्यावेळी काही झालं नाही. तेव्हा  माझ्यावर का गुन्हे नोंदवले नाही. तरी मग आता ही आडकाठी का? याविरोधातच माझी लढाई आहे. मी जो विचार करतो ते चूक की बरोबर हे जनता ठरवेल. ते ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. असं ओवेसींनी पुण्यातील प्रचारसभेत म्हणाले.

दरम्यान, याआधी ओवेसींना पुण्यात सभेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण त्यानंतर एमआयएमकडून पर्यायी जागेचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर पोलिसांनी ओवेसींच्या सभेला परवानगी दिली.

संबंधित बातम्या:

ओवेसींच्या पुण्यातील सभेला अखेर परवानगी

पुण्यात एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारली