Anmol Bhave National Film Awards 2022: संगीत आणि ध्वनीसंयोजन (audiography) हे प्रत्येक चित्रपटात सगळ्यात महत्वाची भूमिका निभावतात. चित्रपटातील प्रत्येक सीन हा उत्कृष्ठ होण्यासाठी त्याला साजेसं संगीत दिलं जातं. यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मी वसंतराव या चित्रपटातील ध्वनीसंयोजनासाठी अनमोल भावे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. 


 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) आज (22 जुलै) घोषणा झाली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  


 'मित्राने ज्यावेळी मला फोन करुन सांगितलं त्यावेळी मी त्या स्टूडियोतील दिवसांत हरवून गेलो होतो. हा मााझ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे. ध्वनीसंयोजन (audiography) हा चित्रपटाचा फार महत्वाचा भाग असतो. दिग्दर्शक निपूण धर्माधिकारीने माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे हा पुरस्कार मला मिळू शकला. मी वसंतराव या चित्रपटावर आम्ही बरेच दिवस काम करत होतो. सगळ्या पद्धतीचं संगीत कसं वापरता येईल आणि ते वसंतरावांना कसं साजेसं होईल याकडे आमचं बारीक लक्ष होतं.त्यामुळे हा पुरस्कार माझ्या टीमचा आहे, असं अनमोल भावे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


या चित्रपटाला प्रेक्षकांनी दाद दिली होती. त्यांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. मात्र चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. राहुल देशपांडे यांना देखील पुरस्कार जाहीर झाला. त्यांची मेहतन फार होती. चित्रपटातील काळ वेगळा होता. पुणे, मुंबई, नागपूर, लाहोर या सगळ्या शहरांचा टच संगीतातून कसा देता येईल?, याचा मी मनापासून प्रयत्न केला. तो प्रयत्न सार्थकी ठरला. हा पुरस्कार मी माझ्या आजीला समर्पित करतोय. काही दिवसापुर्वीच तिचं दुख:द निधन झालं. तिच्यासोबतच माझ्या कुटुंबीयांना देखील समर्पित करतो कारण त्यांच्या शिवाय हे अशक्य होतं. असं म्हणत अनमोल यांंनी आनंद व्यक्त केला.