पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham Dhirendra Shastri) यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंनिसतर्फे करण्यात आली. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदनदेखील दिलं आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील तीन दिवसीय सत्संग आणि दरबार आयोजित केला होता. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 


अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य, दिशाभूल, फसवणूक करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य धिरेंद्र शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यात देखील झाली आहे, असा आरोप महाराष्ट्र अंनिसने केला आहे. महाराष्ट्र अंनिसने मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे. वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी हे धिरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रीपुढे नतमस्तक झाले. त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे दरबारात जाणे हे महाराष्ट्र सेवा अधिनियम व तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.  धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, अशी अंनिसची मागणी आहे. 


 निवेदनात नेमकं काय म्हटलं आहे?


अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. असाध्य आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो, आदी दावे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या कार्यक्रमातून केले आहेत. तसेच संतांसंबंधी चुकीची बदनामीकारक वक्तव्य केली आहेत. भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला देव धर्म श्रद्धा उपासना स्वातंत्र्य दिले. त्याचा महा. अंनिस संघटना आदर करते. मात्र व्यक्तीची देव धर्म श्रद्धा उपासनेच्या आधारे फसवणूक, दिशाभूल, शोषण होत असेल, त्यातून सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता, कायदा सुव्यवस्थेला अडथळा येत असेल तर त्याविरोधी संघटना भूमिका, प्रबोधन, प्रतिकार, कृतिकार्यक्रम करत आली आहे.


अंनिसचे हे वर्तन घटनेशी सुसंगत असून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठीचे आहे. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत. लोकांना ते सांगून प्रभावित करत असून अशास्त्रीय मार्गाने जगण्यास प्रवृत्त करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने विसंगत आहे. भारतीय राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. मात्र धीरेंद्र शास्त्री हे अशास्त्रीय, वैज्ञानिक दावे करून लोकांना प्रभावित करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहोत, असं निवेदनात लिहिण्यात आलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


MP Sanjay Raut Tweet: पिक्चर अभी बाकी है, संजय राऊतांकडून मकाऊतील 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर, बावनकुळेंच्या अडचणी वाढणार?