Ashadhi Wari 2022: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम्या पालखी बरोबरच यंदाच्या वारीत संविंधानाचा देखील जागर होणार आहे.  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून ही संविधानाची दिंंडी असणार आहे. बार्टी मार्फत संपूर्ण नियोजन करण्यात आले असून पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखी सोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली असून 21 जूनला आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा जागर भजन- कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करत 10 जुलै रोजी पंढरपूर येथे पोचणार आहे.


कोरोनामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारी होऊ शकली नाही. मात्र यावर्षी अगदी जल्लोषात पायी वारी होणार असल्याचं चित्र आहे. संत तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान झालं आहे. जयघोषाच्या जल्लोषात आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात यंदा पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला. मात्र यावर्षी पालखी सोहळ्यात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाबरोबरच संविधानाचादेखील जागर करण्यात येणार आहे


संविधान दिंडीमार्फत जगजागृती
वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन असे उपक्रम सुरू राहतील. त्याचबरोबर ठिकठिकाणी संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, दृकश्राव्य माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडी पत्रिकांचे वाटप इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत. 


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन दरवर्षी लाखो भाविक वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देहू-आळंदी येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संमिलीत होतात. देशाचे संविधान देखील आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मुलतत्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, देशाचे नागरिक हे जबाबदार असावेत, या उद्देशाने लाखो भाविकांच्या 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' या जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या पालखी सोहळ्यात यावर्षी संविधान दिंडी आयोजित करण्यात येत आहे.  पालखीच्या या संपूर्ण प्रवासात हरिनाम घोषासह संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न आहे, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.