पुणे : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रपणे लढवणार असल्याची शक्यता आहे. मागील निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. त्यामुळे यावेळी अनेक ठिकाणी जागांचा पेच निर्माण होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभेच्या जागेबाबतही असाच पेच निर्माण झाला आहे.
इंदापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दोघेही आग्रही आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकजण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगू लागली आहे. असे असतानाच आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भरणे यांना बारामतीत भरसभेत टोमणा मारला आहे.
अजित पवारांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांचं तमाम बारामतीकरांच्या वतीनं स्वागत, असे म्हणत स्वागत केले. त्यानंतर अजित पवारांनी असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा आहे, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे भविष्यातील राजकीय घडामोडींचे वेध घेऊन अजित पवारांनी हे वक्तव्य केलेले नाही ना? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहजिकच इंदापूर विधानसभेची उमेदवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापैकी एकाला मिळणार आहे, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यास भरणे भाजपमध्ये जातील, असाही अंदाज बांधला जात आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हेदेखील भाजपमध्ये जाणार अशाही वावड्या उठवल्या जात आहेत.
आज बारामतीत एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे एकत्र आले होते. यावेळी भाषण संपवताना अजित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराचं स्वतःच्या मतदारसंघात स्वागत केलं. येत्या निवडणुकीत भरणे यांनी राष्ट्रवादी पक्षातच राहावे यामुळेच हा टोमणा मारला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा टिकावा हीच अपेक्षा, भरसभेत अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला टोमणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2019 09:16 PM (IST)
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रपणे लढवणार असल्याची शक्यता आहे. मागील निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. त्यामुळे यावेळी अनेक ठिकाणी जागांचा पेच निर्माण होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -