पुणे : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात, त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे. शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांकडून सांगितलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही तसंच काहीसं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजित पवार म्हणाले. पिंपरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवं. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला.
अचानक अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्यानं जगातल्या अनेक देशांत याचा परिणाम जाणवत आहे. कोरोनानंतर हे एक नवं संकट आलेलं आहे. त्याचा आपल्याला सामना करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशात चांगले संबंध जोडलेले आहेतच, याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल असं अजित पवार म्हणाले.
तळ्यात मळ्यात करु नका
आम्ही निर्णय घेतला तरी काहीजणांचे तळ्यात मळ्यात सुरू होतं असं अजित पवार म्हणाले. तसं करु नका, तळ्यात मळ्यात न राहता अण्णा कुठे गेला बघा असं अजित पवार म्हणाले.
भान ठेऊन वागा आणि बोला
पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास आहे. या प्रवासात बनसोडेंनी बरेच चढ उतार पाहिले. यावर मात करत सामान्य कुटुंबातून आलेले अण्णा या पदावर पोहचलेत असं अजित पवार म्हणाले.
विधानसभेत काम करत असताना आता भान ठेऊन वागा आणि बोला असा सल्ला अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना दिला. ते म्हणाले की, "आता तुमच्याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. तुमचं वागणं, बोलणं याकडे सगळेच लक्ष ठेवणार. तुमच्या चिरंजीवांनाही काही गोष्टी सांगा. आपण मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या घरातीलच नातेवाईक काहीतरी वागला तर आपलीच बदनामी होते. त्यामुळे भान ठेऊन काम करा."
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवा. कोयता गँग, अमुक गँग, तमुक गँग हे चालणार नाही असा सज्जद दम यावेळी अजित पवारांनी दिला.