पुणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी गाठीभेटी, मुलाखती, दौरे,पक्षप्रवेश यांना वेग आला आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. अशातच पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. अशातच काल(मंगळवारी) मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे, ही मोठी व्यक्ती कोण आहे, त्याची चर्चा आता रंगली आहे. मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या गाडीत जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा लपवला होता. याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत, फाईलने तोंड लपवलेला हा नेता माजी मंत्री राजेंद्र शिंगणे असल्याची चर्चा आता सुरू आहे.
फाईलने तोंड लपवलेला हा नेता माजी मंत्री राजेंद्र शिंगणे असल्याची चर्चेवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत माध्यमांशी बोलतना अजित पवार म्हणाले, बातम्यांमध्ये मी सुद्धा हे पाहिलं आहे. तुम्हाला काय घेणं-देणं आहे, तुम्ही तुमची कामं करा आणि आहे त्या चॅनेलमध्ये राहा. मुळात तुम्ही 2014 पासून पाहा, जेव्हा-जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा असे नेते निवडणूक लढण्यासाठी पक्षांतर करतात. हे कधी होतं, जेव्हा मतदारसंघ आपल्याला भेटणार नाही. तेव्हा ज्यांना आमदार व्हायचं असतं ते इतर पक्षाचे दार ठोठावत असतात. ज्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार नाहीत, त्यांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागतात, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
‘तो’ नेता नेमका कोण?
काही दिवसांपुर्वी हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश पार पडला. यानंतर आता शरद पवार गटात आणखी एका बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसलेल्या एका नेत्यानं आपला चेहरा लपविल्याचं दिसून आलं. यानंतर सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणारा ‘तो’ नेता नेमका कोण? असा सवाल केला जात आहे. पुण्यातील मोदी बागेतून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने मीडियापासून आपला चेहरा लपवला. सुप्रिया सुळे यांच्या गाडीमध्ये पुढे सुप्रिया सुळे बसल्या होत्या आणि मागच्या बाजूला खिडकी जवळच्या सीटवर एक व्यक्ती बसला होता. त्याने आपला चेहरा फाईलने झाकला होता. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण? अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे.
इंदापूरात शरद पवारांनी मोठ्या पक्षप्रवेशाचे दिले संकेत
सोमवारी पार पडलेल्या इंदापूरातील हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी आणखी पक्षप्रवेशाचे संकेत दिले होते. शरद पवार पक्षप्रवेशावेळी बोलताना म्हणाले, 'चित्र बदलतंय. आज हाच कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला. त्यांनी हट्ट केला. इंदापुरला चाललाय, 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. मी म्हटलं, काय कार्यक्रम आहे? ते म्हणाले, इंदापुरला आहे, तोच आमच्याकडे. म्हटलं कुठे? ते म्हणाले फलटणला", असं शरद पवारांनी सांगितले. त्यानंतर हसतच त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, समजलं का?, पवारांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.