पुणे : गर्दी झाली म्हणून टीका करतेत व्हय. एवढी प्रचंड गर्दी, काय सांगू तुला. आता माणूस आहे, भावुक होणार. जुने दिवस त्यांना आठवले त्यामुळं ते भावुक झाले. घरं चांगली झालीत. कष्टाळू, गरजूंना घरं मिळाली. पंतप्रधान मोदींच्या हस्तेच भूमिपूजन झालं तेंव्हा घरं माझ्या हाताने वितरित होणार, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. तो शब्द खरा ठरला. विरोधकांच्या पोटात का दुखतंय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. 


नरेंद्र मोदी भावुक झाले, अजित पवार काय म्हणाले ?


आता तुम्ही जर आता पत्र्याच्या घरात, छोट्याश्या घरात राहिला असाल. त्यांना त्यांची त्यावेळची अवस्था आठवली असेल आणि पंतप्रधान झाल्यावर आपण अनेकांना घरं देतोय. हे पाहून भावुक झाले असतील. मी पण आधी पत्र्याच्या घरात, सारवलेल्या घरात राहायचो, नंतर बंगला झाला. काळानुरूप परिस्थिती बदलत असते. आता मोदी पंतप्रधान आहेत, मात्र पूर्वीचे दिवस कोणीच विसरत नाही. ते आज त्यांना आठवलं असेल, म्हणून ते भावुक झाले असावेत, असे अजित पवार म्हणाले.


रोहित पवारांच्या समन्सवर अजित पवार स्पष्टच बोलले -


रोहित पवार यांना समन्स आला की नाही माहित नाही. पण ईडी ही केंद्रीय यंत्रणा आहे. मागे मलाही नोटिसा आलेल्या आहेत. त्यात तथ्य असेल तर अडचणी येतात, नसेल काही तर अडचण येत नाही, असे अजित पवार म्हणाले. 


तुम्ही तरुणांना संधी देणार ?


मी राजकारणात आलोय, तेव्हापासून तरुणांना संधी देत आलोय. आत्ताच्या आमदारांमध्ये तरुण मोठ्या संख्येने आहेत. पुढेही मी तरुणांना संधी देणारचं, असे अजित पवार म्हणाले. 


संजय राऊतांवर टीका करताना विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोला अजित पवारांनी लगावला.  तर पंतप्रधानांसोबत महागाई, कांदा प्रश्न बाबत बोलणार का? याबाबत अजित पवार यांनी विचार करेन असं सांगितलं.
 


सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघाच्या बॉर्डरवर आहात?


मी पुण्याचा पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. कोणाच्या मतदार संघाच्या आत किंवा बाहेर हा प्रश्न नाही. राज्यात सर्वत्र लक्ष देणं आणि नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य आहे, असे अजित पवार म्हणाले.


सहकारमंत्री पद पहिल्यांदाच पुणे जिल्ह्याकडे - 


सहकारमंत्री पद पहिल्यांदाच पुणे जिल्ह्याकडे आले, हे मी अगोदरच ठरवले होते. बऱ्याच बँकांच्या(रुपीबँक, अनिल भोसले बँक) प्रशासनाने बँका लोकांसाठी चालवण्याऐवजी मुठभर लोकांसाठी बँका चालवल्या, पण यामुळे सर्वांना त्यात लेखलं जाणं चूकीचं आहे. कार्यक्रमांना पाच दहा मिनिटे लवकर जाणारा मी एकमेव राजकीय कार्यकर्ता. जोपर्यंत मला हे शक्य तो पर्यंत हे मी करणार, असे अजित पवार म्हणाले.


शरद पवारांना टोला - 


बँकांमध्ये तरुणांना संधी दिली पाहीजे. नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाहीत, असा टोला यावेळी अजित पवार यांनी शरद पवारांना  अप्रत्यक्ष टोला लगावला.भिडेवाड्याच्या विकासाचा प्रश्न लवकर मार्गी लावायचा आहे. जागाही ताब्यात आली आहे. 


पुणेकरांच्या सहनशिलतेला सलाम - 


पुणेकरांच्या सहनशिलतेला सलाम, सगळीकडे कामं सुरू आहेत. अनेक कामं झालेले असतात पण उद्घाटनासाठी तिथे जायला वेळ लागतो. मागे मी स्वारगेट येथे सकाळी ७ वाजता उद्घाटन केलं. ८ वाजता शपथ घेतली तरी पहाट म्हणतात. पण माझ्या भाषेत 4 म्हणजे पहाट, असे अजित पवार म्हणाले. विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत काम गतीने करायला सुरूवात केली पण झाडांसाठी कोणी कोर्टात गेलं ते थांबलं. सगळीकडे काम करणं सोप पण इथे मी मी म्हणणाऱ्यांनी हात टेकले, असेही अजित पवार म्हणाले.