मुंबईअजित पवारांचे (Ajit Pawar)  सुपुत्र पार्थ पवारांच्या (Parth Pawar) एका भेटीमुळे वाद निर्माण झाला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी गुंड गजा मारणेची  भेट घेतली. ज्याचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या भेटीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले. अखेर आज अजित पवारांनी या संदर्भात मौन सोडले. पार्थ पवार आणि गुंड गजा मारणेची भेट चुकीचं असल्याचे अजित पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले, पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचे झाले आहे. पार्थ ज्या घरी गेला होता त्याठिकाणी गजा मारणे  आला होता.  माझ्या सोबत देखील असाच प्रकार घडला होता मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलीसांना आधीच सांगून ठेवतो. 


भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ


जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत. सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमधे आले असता त्यांनी जयश्री मारणेंच्या घरी भेट दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


पार्थ पवार आणि गुंड गजा मारणेची भेट


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि गजा मारणेच्या घरी सदिच्छा भेट झाली. या भेटीचं निमित्त होतं ते विधानसभा मतदारसंघातील दौरा होते.  निवडणुका जवळ आल्याने अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार पुणे विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.  पार्थ पवारांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्याचवेळी त्यांनी मारेणेंच्या घरी भेट दिली . त्यावेळी गजानन मारणे आणि पत्नी जयश्री मारणेंनी पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचं स्वागतही केलं.  हाच स्वागत समारंभ आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.


राजकारणात गुंडांना महत्त्व वाढतंय का?


गुंडांच्या कामाचं कौतुक करणं त्यांच्या घरी गाठीभेटी देणं हे दिवसेंदिवस वाढू लागलंय त्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्याचं राजकारण गुंडांभोवती फिरतंय का? राजकारण्यांना गुंडांचा पाठिंबा का गरजेचा वाटतोय? गुंडांच्या आड मतांचा आकडा वाढवण्याचा हा प्रयत्न म्हणायचा का? जर राजकीय मंडळीच गुंडांच्या कामाचं कौतुक करत असतील तर हे गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासारखं नाही का? राजकारणात गुंडांना महत्त्व वाढतंय का? हे गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत परंपरा आहे. त्यामुळे ज्यांची पार्श्वभूमी रंक्तरंजित आहे,अशा गुंडा पुंडांना जवळ करून राजकारणावर डाग लावावा का? याचा विचार आता करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.