बारामती : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलेल्या शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्याचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांनी आता भाजपला थारा देऊ नये, असे अजित पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.


बारामतीत आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आणि सरपंच व नवनियुक्त सदस्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी अजित पवार यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही निशाणा साधला.

देशाचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी भाजपला थारा देऊ नये, असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

तसेच, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लोकमंगल संस्थेच्या माध्यमातून केलेला कर्ज घोटाळा, अग्निशमन केंद्राच्या जागेवरील बंगला अशी अनेक प्रकरणं असताना इतरांप्रमाणेच सुभाष देशमुख यांनाही पदावरुन दूर केलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

कोणताही घोटाळा समोर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जातात. मग सुभाष देशमुख यांनाच वेगळा न्याय का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.