पुणे: वैष्णवी हगवणेला (Vaishnavi Hagawane death) जीव देण्यासाठी भाग पाडणाऱ्या हगवणेच्या गळ्याभोवती कारवाईचा फास अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं आहे. थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केला नाही, असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला होता. तर आता जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी ही हगवणेंची (Vaishnavi Hagawane death) पोलखोल केली आहे. येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहचलाच नाही, अशी माहिती खांडेभराडांनी पोलीस चौकशीत दिली आहे. त्यामुळं येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे हगवणेची माणसं होती आणि हा कटाचा भाग होता, या शंकेवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. या चौकशीतून लता हगवणे आणि शशांक हगवणे या माय-लेकाचे पाय आणखी खोलात गेले आहेत. आता म्हाळुंगे पोलिसांकडून जेसीबी जप्त करायला आलेल्या भामट्यांचा शोध सुरु आहे. 

जेसीबी आम्ही जप्त केलाच नाही; इंडस इंड बँकेचा खुलासा

जेसीबी विक्री फसवणुकीत इंडस इंड बँकेने मोठा खुलासा केला. तक्रारदार प्रशांत येळवंडे कडून आम्ही जेसीबी जप्त केलाच नाही, असा खुलासा बँकेने केला आहे. त्यामुळं येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे शशांक हगवणेची माणसं होती, ही शंका आता खरी ठरताना दिसत आहे. म्हाळुंगे पोलिसांनी काल (बुधवारी) बँकेच्या लीगल डिपार्टमेंटची चौकशी केली, त्यानंतर शशांक आणि लता हगवणेंची अडचण वाढल्या आहेत.

म्हाळुंगे पोलिसांनी जेसीबी जप्ती प्रकरणात काल दोन जबाब नोंदवले आहेत. त्यामध्ये हगवणे यांची पोलखोल झाली आहे. पहिला जबाब नोंदवला तो इंडस इंड बँकेचा, या बँकेचे लोन त्या जेसीबीवरती होतं. मात्र, तो जेसीबी हगवणे यांनी काळवंडे यांना विकला. मात्र जेसीबीचे हप्ते थकले म्हणून इंडस इंड बँकेने हा जेसीबी प्रकाश येळवंडे यांच्याकडून जप्त केला असं शशांक हगवणे याने भासवल्याचा समोर आलं आहे. या प्रकरणात इंडस इंड बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही प्रशांत येळवंडे यांच्याकडून कोणताही जेसीबी जप्त केला नाही. आम्ही कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळेच आता शशांक हगवणे यानेच त्याचे भामटे बॅंकेचे एजंट म्हणून पाठवून प्रशांत येळवंडे यांच्याकडून हा जेसीपी जप्त केला अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. 

हा जेसीबी जप्त केला असता तर तो बँकेने थेट गोडाऊनमध्ये नेला असता आणि त्या गोडाऊनचे मालक रणजित आणि भूषण खांडेभराड यांच्या गोडाऊनमध्ये देखील तो जेसीबी पोहोचला नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. या दोघांची देखील पोलिसांनी चौकशी केली, त्यांनी देखील चौकशी वेळी स्पष्ट सांगितलं की, येळवंडे यांच्याकडून जप्त केलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत आलेला नाही. बँकेने कोणतीही गाडी जप्त केली तर ती या गोडाऊनमध्ये येते परंतु तो जेसीबी तिथे आला नाही, म्हणजे थेट शशांक हगवणे यानी त्याची माणसं पाठवून प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त करून घेतला आणि बँकेने जप्त केला आहे असं सांगितलं आणि तो थेट आपल्या ताब्यात घेतला, यामुळे आता शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर हे प्रकरण चर्चेत आलं. मात्र, आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.