पुणे : सांगली आणि कोल्हापुरात पुरानं अक्षरशः थैमान घातलं. या पूरपरिस्थितीसाठी कमी वेळेत झालेला मुसळधार पाऊस जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रशासन आणि सरकारच्या कारभारावर निवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
पूरपरिस्थितीत प्रशासन नेमकं कुठे चुकलं यावर देखील महेश झगडेंनी बोट ठेवलं आहे. पुणे-हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता, तरी देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने पूर्वतयारी करायला हवी होती, मात्र तसं झालं नाही, असं महेश झगडे यांनी म्हटलं.
2005 साली देखील अशीच पूरपरिस्थिती उद्भवली होती. मात्र प्रशासनाने त्यातून काहीच बोध घेतला नाही. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग आता केला जात आहे, मात्र हे जर आधीच केलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला आहे, असं महेश झगडेंनी सांगितलं. तसेच प्रशानसनाने त्यांची चूक मान्य करायला पाहिजे असंही ते म्हणाले.
राजकीय नेतृत्वाने अशी आपत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाला सारखे प्रश्न विचारून कामांचा आढावा घेतला पाहिजे. त्यामुळे अशी आपत्ती टाळली जाऊ शकते, असा सल्लाही झगडेंनी दिला.
या संपूर्ण परिस्थितीला सध्याची प्रशासकीय संस्कृती जबाबदार आहे. यामध्ये जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जेणेकरुन अशी प्रशासकीय संस्कृती बदलण्यास मदत होईल, असं मत महेश झगडेंनी व्यक्त केलं.