तळेगाव (पुणे) : वेदांता फॉक्सकाॅन कंपनी आता गुजरातमध्येही होणार नाही. गुजरातमध्ये कंपनी उभारण्यास सात वर्षे लागणार होती, त्यामुळे करार रद्द केला. त्यांनी देशातूनच हद्दपार व्हायचा निर्णय घेतला. म्हणजेच गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचं नुकसान झालं आहे, आता सांगा, मग खरे देशद्रोही कोण आहेत? अशा शब्दात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पीएम मोदींवर (PM Modi) घणाघाती हल्ला चढवला. ते आज (21 जानेवारी) तळेगावमध्ये जाहीर सभेत बोलत होते. या सभेतून आदित्य यांनी भाजप आणि शिंदे फडणवीस सरकावर सुद्धा सडकून टीका केली.


22 जानेवारीला मोठा दिवस आहे. अयोध्येत (Ram Mandir) श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, पण आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. "हृदयात राम आणि हाताला काम" हे आपलं हिंदुत्व असल्याचे ते म्हणाले. औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचे धाराशिव केलं,  पण आम्ही कुठंही दंगली घडू दिल्या नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


160 कंपन्या राज्यात येणार होत्या. मात्र त्या राज्याबाहेर


आदित्य ठाकरे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात स्वागताचे स्वरूप सभेत होत आहे. आता पुढची सभा विजयाची होईल. वेदांता फॉक्सकाॅनसह 160 कंपन्या राज्यात येणार होत्या. मात्र त्या राज्याबाहेर पळविण्यात आल्या. यामुळं लाखो तरुण बेरोजगार झाले. हे घडलं नसतं, मात्र काहींनी गद्दारी केली. कोण-कोणाला रात्री भेटलं आणि शिवसेनेशी गद्दारी करण्यात आली. ही गद्दारी म्हणजे देशाशी बेईमानी आहे. 


देशात फक्त महाराष्ट्रावर अन्याय 


त्यांनी सांगितले की, राज्यात आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. सत्तेत आलो की पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देऊ म्हणाले होते. रोजगार मिळवून देऊ म्हणाले, महागाई संपवू म्हणाले होते. आता काय सुरु आहे? तर सत्तर वर्षांपूर्वी त्यांनी काय केलं होतं? आता किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहेत? अशी विचारणा त्यांनी केली.   


देशात फक्त महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे, यासाठी नवं कलम आणलं आहे, पण महाराष्ट्राने किती दिवस अन्याय सहन करायचा? आता तुम्ही पुन्हा या मिंदे सरकारला सत्तेत आणलं तर ते आपलं मंत्रालयही गुजरातला पळवतील, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री बर्फात फिरून येतात, पैशाचा चुराडा करतात. वऱ्हाड निघालं लंडनला तसं सरकार निघालं डाओसला. जातात ते जातात, दलालांना तिथं घेऊन जातात. मग देशाला काय फायदा याचा? असे ते म्हणाले. 


तलाठी भरती घोटाळा पुढं आला. घोटाळा झाला ते झाला, 200 पैकी 214 मार्क मिळाले. ज्याला एक खातं चालवता येत नाही त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं, असा झालाय हा घोटाळा. आता पेपटफुटी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊ, असा कायदा आणा, अशी मागणी त्यांनी केली.  


इतर महत्वाच्या बातम्या