Pune Bullete News: सायलेन्सरमधून फटाक्याचे आवाज काढत बेफाम होऊन बुलेट राजांना महाग पडणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अशा बुलेट राजांवर आता थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. या सहा महिन्यात वीस हजार बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई झाली. वीस लाखांचा दंड ही त्यांच्याकडून वसूल करण्यात आला. मात्र तरीही बुलेट राजांमध्ये सुधारणा होईना, म्हणून थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. वाहन जप्ती आणि लायसेन्स रद्द करण्याच्या दृष्टीनेही पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस पावलं उचलत आहेत. 


पिंपरी-चिंचवड शहरातून सायलेन्सर बदलून बुलेट चालवल्या जातात आणि लोकांना फार याचा त्रास होत आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. हा प्रकार आमच्यादेखील निदर्शनास आला. मागील सहा महिने आपण बुलेटवर कारवाई केल्या. त्यात 22 लाखांचा दंड वसूल केला तरी काही चालकांमध्ये फरक पडलेला नाही. मॉडिफाय करण्यासोबतच, पर्यावरणाचा ऱ्हास करणे, यावरुन कारवाई केली जात आहे. आतापर्यंत दंडात्मक कारवाई केली होती. मात्र तरुणांची वागणूक पाहता आता आम्ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच हा प्रकार थांबला नाही तर वाहनदेखील जप्त करण्याच्या विचारात आम्ही आहोत. त्यामुळे तरुणांनी नियमांचं पालन करावं नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पिंपरी चिंचवड शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिला आहे.


पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक तरुण बुलेट वापरतात. त्या बुलेटला वेगळा सायलेंसर बसवतात. त्यामुळे शहरातील अनेक भागात ध्वनीप्रदुषण होतं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ध्वनी प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच वायु प्रदुषणाचा प्रश्नदेखील कायम आ फाडून असतो. त्यामुळे दोन्ही शहरात अनेकदा या प्रकारची कारवाई करण्यात आली होती. अनेकदा वेगवेगळे प्रश्न आणि समस्या निर्माण करताना हे तरुण कायम दिसतात. यावरुन यंदा पोलिसांनी अतिहौशी  तरुणांना चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे अशीच हौशी मंडळी असेल तर त्यांना लगेच आवर घालणं गरजेचं आहे.