Pune Koyta Gang News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने (Koyata Gang) धुडगूस घातला आहे. कोयता गँगचे हल्ले रोखण्यासाठी पुणे पोलीस (pune police) सर्व प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नवनवीन शक्कल लढवली जात आहे. आता पुणे पोलिसांनी आणखी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. पुण्यात कोणी कोयता खरेदी करत असेल तर आधी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. पुणे पोलिसांनी हा नियम काढला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात पुण्यातील "कोयता गँग"ची चर्चा सुरु आहे. पुणे शहरातील अनेक भागात तरुणांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसतायत. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहेच शिवाय व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी विशेष पथकं नेमून कोयता गँग मधील अनेक आरोपींना जेरबंद केलं, त्यांची धिंड काढली मात्र अजूनही पुण्यातील या टोळ्यांचे वर्चस्व कमी झालेलं दिसत नाही.
अगदी दोन दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून पुण्यातील नूतन मराठी महाविद्यालयातील अवघ्या 17 वर्षांच्या मुलांनी कोयत्याने हल्ला केला. यात पोलिसांनी दोन्ही गटातील तरुणांना अटक केली, मात्र कोयता गँगची दहशत कमी कधी होणार हा प्रश्न पुणेकरांच्या मनात कायम आहे. पुणे पोलिसांनी हे हल्ले रोखण्यासाठी आता कोयता खरेदीसाठी आधारकार्ड सक्तीचं केलं आहे.
कोयता हे बाकदार पाते असलेले शेतीचे तसेच बागकामासाठी वापरलेलं हत्यार आहे. कोयत्याचा वापर पिकाची कापणी करण्यासाठी, तसेच शेतातील इतर कामांसाठी केला जातो मात्र अलीकडे याच हत्याराने पुण्यातील तरुणांनी अनेकांना जिवे मारण्याचा, धमकवण्याचे प्रकर सुरू केले आहेत. 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत मिळणारे हे हत्यार शहरातील अनेक ठिकाणी अगदी सहज उपलब्ध होतं मात्र आता कोयता गँग वर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. आता कोयता घेण्यासाठी जाणाऱ्यांना आधार कार्ड द्यायवे लागणार आहे.
यामुळे इथून पुढे कोयता विक्रेत्यांना कोयते घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्डची एक प्रत घ्यावी लागणार आहे. इतकंच काय तर हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्या पोलिसांवर आता शहर पोलिस दल बक्षीसांची खैरात करणार आहे. कोयता बाळगणार्याला पकडल्यास त्या पोलिस कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून नवनवीन प्रयोग राबविण्यात येत आहे खरं पण यामुळे खरंच गुन्हेगारीला वचक बसेल का हे प्रश्नच आहे येणारी वेळच सांगेल.