RSS Fake facebook Page: RSS संघराज या नावाच्या युट्यूब (Youtube) खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी या पेजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शरद पवार आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर विचित्र कमेंट केल्याचा आरोप या पेजवर करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या युट्यूब अकाऊंटवर आक्षेप घेतला होता. या खातेधारकावर कारवाई करण्याची मागणीदेखील केली होती.


नक्की काय  होतं प्रकरण?
`RSS संघराज` नावाचं फेसबुक पेज आणि इतर संबंधीत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मव्दारे  देशभरातील नागरिकांच्या मनात श्रद्धास्थानी असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली जाते आहे. जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासंबंधाने पोलिस, सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार आणि आपली सर्वांची श्रद्धा असलेल्या महापुरूषांची बदनामी रोखावी, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी केली होती.पोलीस व सायबर क्राइम विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिस यंत्रणांनी तपास सुरू केला होता.


बाबासाहेब पुरंदरे आणि शरद पवार यांच्यावरही हीन दर्जाची कमेंट
 रा. स्व. संघ आणि संघ विचारांनी चालणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याच्या हेतूने फेसबुकवर `RSS संघराज नामक फेसबुक पेज व इतर संबंधीत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मव्दारे  देशभरातील नागरिकांच्या मनात श्रद्धास्थानी असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली जाते आहे. त्यासोबतच कै. बाबासाहेब पुरंदरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरही हीन दर्जाची कमेंट करत खोटा आणि अपप्रचार करणारा संघाची बदनामी करणारा मजकूर व्हायरल केला जातो आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असंही श्री. करपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले होते. `RSS संघराज` हे अकाऊंट आमचं नाही आहे आणि असा कोणताही प्रचार किंवा माहिती आम्ही प्रसारीत केली नाही आहे. आमच्यावर रचलेला हा कट आहे. हेतूने जाणीवपूर्वक असा मजकूर पसरवला जातो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.