पुणे : सतत टीव्हीवर कार्टून आणि चित्रपट पाहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाला आईने टीव्ही पाहण्यास मज्जाव केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने उचललेल्या या पावलामुळे बिबवेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बिबवेवाडीतील राजीव गांधी नगर परिसरात हा मुलगा कुटुंबियांसह राहत होता. त्याला कार्टून पाहण्याची आवड होती. मंगळवारी दुपारी कार्टून पाहण्यावरून आई त्याला रागावली आणि टीव्ही बंद केला. त्यामुळे रागावलेल्या अल्पवयीन मुलगा वर असलेल्या घरात गेला आणि दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोखंडी अँगलला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतला.

दरम्यान बराच वेळ झाला तरी मुलगा परत येत नसल्याचे पाहून आई त्याला पाहण्यासाठी वर गेली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्यानंतर इतर लोकं धावून आली आणि त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात नेले. परंतु त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण लिटे करीत आहेत.