पुणे : वटपैर्णिमेचा मुहूर्त साधत चोरट्यांनी हात साफ केले आहेत. पुण्यात आज सकाळपासून तब्बल 13 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. लष्कर, शिवाजीनगर, वाकड, चतुश्रुंगी, कोंढवा, सांगवी, भारती विद्यापीठ परिसरात चेन स्नॅचिंगचे प्रकार घडले.


वटपौर्णिमेला महिला वडाची पूजा करण्यासाठी नटूनथटून, दागिने घालून घराबाहेर पडतात. त्याचाच फायदा घेत पुण्यातील शिवाजीनगरमध्ये दोन, चतुश्रुंगीमध्ये दोन, सांगवीमध्ये चार, लष्करमध्ये एक, चतु:श्रुंगीमध्ये एक, वाकडमध्ये एक, कोंढवामध्ये एक आणि भारती विद्यापीठ परिसरात एक, अशा एकूण 13 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत.

हातात पुजेचं साहित्य तसंच लहान बाळ असलेल्या महिला हेरुनच हे चोर दागिन्यांवर डल्ला मारत आहेत.



पुण्यात दुपारपर्यंतच चोरीच्या अकरा घटना घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. परिणामी काही महिला शक्य तेवढे कमी दागिने घालून वडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत.

पुणे क्राईम ब्रान्चची युनिट वनची टीम सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चेन स्नॅचर्सचा शोध घेत आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही वटपौर्णिमेच्या दिवशी चेन स्नॅचिंगच्या 12 घटना घडल्या होत्या.