मुंबई: मुंबईमध्ये टोमॅटोचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वी 100 रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोचा भाव 20 रुपयांनी उतरला असून 80 रुपये किलोने विक्री होत आहे.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी टोमॅटोच्या उत्पादनात 75 टक्के फरक पडल्याने टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत.

 

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव हे टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, येथून संपूर्ण देशभरात टोमॅटो पाठवले जातात. पण येथील बाजारपेठेतही टोमॅटोची आवक घटल्याने टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

 

तर दुसरीकडे कर्नाटकातील कोलारमधील बाजारपेठेतून रोज 500 ट्रक टोमॅटो देशभरात पाठवला जात आहे. सध्या कोलार बाजारपेठेत 734 रुपये प्रति क्विंटल ते 2800 रुपये प्रति क्विंटलने टोमॅटोची विक्री सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील सर्व टोमॅटो व्यापारी खरेदीसाठी कर्नाटकातील कोलार मार्केटात दाखल होत आहेत. सध्या कोलार मार्केटमधून महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कोलकत्ता आणि बांग्लादेशमधील बाजारात टोमॅटो विक्रीसाठी पाठवला जात आहे.

 

यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक फळभाज्यांसोबतच टोमॅटोच्या उत्पादनातही घट झाल्याने विक्रेत्यांनी कर्नाटकामधील बाजारपेठेत धाव धेतली आहेत.