सोलापूर : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' आज जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.
राज्यपाल कोश्यारी यांचेकडून रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे.सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा 1- दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डिसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे, असं राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.