कोल्हापूर: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) सध्या पोलीस कोठडीत आहे. तो मी नव्हेच म्हणत महिनाभर गुंगारा देणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या कोठडीत मात्र आता पोपटासारखा बोलू लागला असल्याचे पुढे आले आहे. या पोलीस चौकशीदरम्यान आपल्या कृत्याची कबुली कोरटकर याने दिली आहे. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता, असे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्रीनंतर पा तास केलेल्या चौकशीवेळी प्रशांत कोरटकरने महत्त्वाच्या आरोपांची कबुली दिली. तसेच मोबाईलमधील डेटाही स्वत:च डिलिट केल्याचे प्रशांत कोरटकर याने मान्य केले. अटक टाळण्यासाठी आपण हैदराबादमार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत होतो, असेही कोरटकर याने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, मंगळवारी दिनांक 25 मार्च 2025 रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज (28 मार्च) पूर्ण होत असून आज कोरटकरला दुपारनंतर कोर्टासमोर सादर केलं जाईल, अशी माहिती आहे.
कोरटकरची पोलीस कोठडी वाढवून घेण्याची शक्यता
प्रशांत कोरटकरला आज (28 मार्च) पोलीस कोठडी संपते आहे. आज दुपारी अडीच वाजता प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलीस पुन्हा एकदा कोर्टाच्या समोर सादर करतील. गेल्या तीन दिवसांमध्ये कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरकडून विविध माहिती घेतली आहे. यावेळी आपणच इंद्रजीत सावंत यांना फोन केल्याचे देखील प्रशांत कोरटकरने कबूल केले आहे. इतकच नाही तरआपण हैदराबाद मार्गे चेन्नईला पळून जाणार होतो याची कबुली देखील त्याने कोल्हापूर पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आज ही सगळी माहिती कोर्टामध्ये सादर करून कोल्हापूर पोलीस पुन्हा एकदा प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी वाढवून घेण्याची शक्यता आहे.
कोरटकरच्या तीन दिवसाच्या कोठडीत काय काय घडलं?
मंगळवारी दिनांक 25 मार्च 2025 रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
पोलीस कोठडी मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकरची चौकशी करण्यास सुरुवात केली
पहिल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी कोरटकरकडे तपास केला
पहिल्या दिवशीच्या तपासामध्ये पोलिसांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली मात्र अडचणीचे प्रश्न टाळत राहिला
सरकारी भत्याप्रमाणे त्याला दोन चपाती आणि भाजी देण्यात आली
बुधवारी दिनांक 26 मार्च 2025 रोजी प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले
फॉरेन्सिक टीमने तब्बल सहा तास प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले
त्याच रात्री कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा प्रश्नांचा भडिमार सुरू केला
मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवलेल्या चौकशीत मीच इंद्रजीत सावंत यांना फोन केला होता याची कबुली त्याने दिली
पोलिसांकडे जमा केलेला मोबाईल मधील डेटा देखील मीच डिलीट करून दिला
हैदराबाद वरून चेन्नईला जाण्याच्या तयारीत होतो याची कबुली देखील कोरटकरने दिली
त्याच रात्री माझ्या छातीत दुखत असल्याचा कांगावा प्रशांत कोरटकरने केला
इतकच नाही तर पोलीस कोठडीतील जेवण देखील पूर्ण जेवला नाही
गुरुवारी दिनांक 27 मार्च 2025 रोजी पहाटे साडे पाच वाजता कोरटकरला वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर काढलं
वैद्यकीय तपासणी करून त्याला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलं
पोलिसांच्या चौकशीत त्याने दोन गाड्या वापरल्याची माहिती दिली
इतकंच नाही तर काही नातेवाईक आणि मित्रांची मदत घेतल्याची माहिती देखील त्याने दिली
कोल्हापूर पोलिसांची पथकं त्या संबधित व्यक्तींच्या चौकशीसाठी रवाना झाली आहेत
गुरुवारी देखील मध्यरात्री पर्यंत कोरटकरची चौकशी करून जबाब घेण्याचं काम पोलिसांनी केलं...
आज त्याला दुपारनंतर कोर्टासमोर सादर केलं जाईल
हे ही वाचा