मुंबई : देशाची आर्थिक स्थिती खराब आहे आणि त्यात सीएए आणि एनआरसीसारख्या गोष्टी घडत आहेत. सूर्यग्रहणासारखे देशाला ग्रहण लागले आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) विरोधात वंचित बहुजन आघाडीने दादरमध्ये गुरुवारी धरणे आंदोलन केलं. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केले.


यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान आणि अमित शाह खोटं बोलत आहेत. आधी संसदेत त्यांनी एनआरसीबद्दल बोललं गेलं होतं. आरएसएसचा हा अजेंडा आहे, हे खोटं बोलतात. याआधी जनगणना झाली आहे. आता कशी करत आहे. आमच्या मोर्चात भटके विमुक्त देखील सहभागी होतील, आम्हाला जाणीव आहे, त्यांच्याकडे कागदपत्र नसतात. भाजपला आता जाणीव होते की रस्त्यावर फक्त मुस्लिम उतरत नाही. तर इतरही घटक उतरत आहे, आर्थिक स्थिती वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असे ते म्हणाले.

या आंदोलनाच्या आधी एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणी नुसती पोलिसांची चौकशी नाही तर त्या पोलिसांना ज्या पॉलिटिकल बॉसेसने सूचना दिल्या. भिडे आणि एकबोटे यांना मोक्का लागणार होता, तो लावू नये म्हणून कोण पॉलिटिकल बॉसेस प्रयत्नशील होते तेही समोर आले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित करताना म्हटलं की, भाजपाकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने आणलेली डिटेन्शन कॅम्पची जी पद्धत आहे, ती ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. त्यावेळी त्यांनी जो गुन्हेगारी जमात कायदा केला यामध्ये ज्या जमातींना गुन्हेगार ठरवलं गेलं, त्या जमातींना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यातं आलं होतं. या देशात ज्यांना शिक्षणाची दारं व्यवस्थेनं बंद केली होती, त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या अलीकडच्या पिढीकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. एनआरसी या लोकांविरोधात असणार आहे. जर तुम्हाला या डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

हेही वाचा-  'वंचित'ला भाजपची बी टीम म्हणणारे आता काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची बी टीम म्हणणार का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे. मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची बी टीम आहे, असं का बोलत नाही, असा प्रश्न बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काल विचारला होता. प्रकाश आंबेडकर एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते.