मुंबई : विधानसभेनंतर आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना युबीटी पक्षाने बांधणी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतेच पक्षाचे प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर, आता मुंबईतील लालबागचे शिवेसना सुधीर साळवी (Sudhir salvi) यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यातच, आपलं लक्ष मुंबई महानगर पालिकांच्या निवडणुकांवर आहे, त्यासाठीच सुधीरला सचिव पद दिलंय, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सुधीर साळवी यांची शिवसेना (Shivsena) सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर लालबाग परळ येथील शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी, उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. 

सुधीरवर मोठी जबाबदारी दिली आहे, तुम्ही लालबागकर आहात. सुधीर आता लालबागमध्ये राहिला, त्याला शिवसेनेचे सचिवपद दिलं आहे. लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच.  काल परवा बातम्या आल्या उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी. पण, आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे, त्यासाठी सुधारला सचिव पद दिलेलं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मी सुधारला मुंबईत पळवणार आहे, सर्वच एकत्र आहात, एकजुटीने रहा. मुंबई आणि महाराष्ट्रावरील संकट बाजूला टाकण्यासाठी आपण एकत्र आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले. 

दरम्यान, लालबाग परिसर हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे, सुधीर साळवी यांच्याकडे मोक्याच्या क्षणी पक्षाचे सचिवपद देऊन उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय समीकरणे साधल्याची चर्चा आहे. तर, सुधीर साळवी यांना अखेर लालबागचा राजा पावला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभेला उमेदवारी नाकारली

सुधीर साळवी हे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले 20 वर्षे मानद सचिव आहेत. लालबाग परिसरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच, विधानसभा निवडणुकांवेळी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. मात्र, विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच तिकीट देण्यात आले. त्यावेळी सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. मात्र, आता कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाल्याचं दिसून येत आहे. कारण, सुधीर साळवी यांना सचिवपदाची जबाबदारी देण्यासोबतच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचेही मिशनही उद्धव ठाकरेंनी दिले आहे. 

सुधीर साळवी कोण?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळामुळे सुधीर साळवी यांच्याभोवती एक वलय निर्माण झाले आहे. गणपतीच्या काळात अनेक बडे नेते आणि सेलिब्रिटी हे लालबागच्या दर्शनाला येतात. यावेळी सुधीर साळवी सर्वांचे आदरातिथ्य करताना दिसतात. त्यामुळे, सुधीर साळवी यांचा चांगलाच 'वट' तयार झाला आहे. त्यातच, विधानसभा निवडणुकांपूर्वी लालबागमधील त्यांच्या कार्यालयासमोर जमून शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे साळवी हे विधानसभेला वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा होती. भाजप आणि शिंदे गट त्यांच्यासाठी गळ टाकून बसल्याचे सांगितले जात होते. परंतु, मातोश्रीवर बोलावून सुधीर साळवी यांची योग्यप्रकारे समजूत काढण्यात आली, व ते ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. 

हेही वाचा