Lamborghini in Mantralaya :  मंत्रालय परिसरात सामान्य जनतेला जाण्यासाठीअनेक वेळ वाट पाहावी लागते. मात्र, बुधवारी काळ्या काचा लावलेली एक अलिशान लम्बोर्गीनी कार मंत्रालयात दुपारी 3 वाजता पोहोचली आणि मंत्रालयात आलेल्या सर्वांचंच लक्ष तिकडे गेलं. सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तासंतास प्रतीक्षा करावी लागते. मात्र, या अलिशान लम्बोर्गीनीला गेटवर ना कुणी अडवलं, ना चेंकिंग झाली. त्यामुळे सर्वांच्याच नजरा या लम्बोर्गीनीकडे गेल्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना भेटण्यासाठी या कारमधून व्यक्ती आल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे, सर्व सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायला तासंतास वाट बघावी लागते. मात्र या कारची चेकिंग न करताच मंत्रालयात एन्ट्री देण्यात आली. तर या कारच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे कारमध्ये नेमकं कोण होतं? याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही आलिशान कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो, त्याच ठिकाणी थांबल्याने आलिशान कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, त्यावरून आता विरोधी पक्षांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी  प्रश्न उपस्थित केले आहेत. 


रोहित पवारांनी सोशल मिडियावरती एक पोस्ट लिहून या प्रकरणात प्रस्न उपस्थित केले आहेत. "काल मंत्रालयात काळ्या रंगाची एक महागडी गाडी आली, ही महागडी गाडी कुणाची? कुणाला भेटायला आले? कोणत्या कामासाठी भेटायला आले? अशा बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. एरवी सर्वसामान्यांची नाकाबंदी करणारी मंत्रालयीन यंत्रणा या महागड्या गाडीची कुठलीही चौकशी न करता आत सोडते म्हणजे गाडी मालक देखील महागड्या गाडी प्रमाणे नक्कीच महागडा असेल. पण, या महागड्या काळ्या गाडीच्या महागड्या मालकाच्या काळ्या कारनामांचा लवकरच खुलासा करू!", असंही त्यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 




राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला कोण आलं?


लॅम्बोर्गिनी कारमधून आलेली व्यक्ती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी आली होती का? अशी चर्चा मंत्रालयात रंगल्या आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच कोणीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे कार कुणाची, कोण आले होते, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


आलिशान लॅम्बोर्गिनीमध्ये नेमकं कोण होतं? 


कारण गाडीच्या काचा संपूर्णपणे काळ्या होत्या. गाड्यांच्या काचांना काळ्या रंगाची फिल्म लावता येत नाही, असे मुंबई पोलिसांचे नियम आहेत. मात्र काळ्या काचा असलेल्या आलिशान कारने थेट मंत्रालयात प्रवेश केल्याने या कारची जोरदार रंगली आहे. तर यावरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसून येत आहे. सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर अटी-नियम घालण्यात आले आहेत. मात्र, व्हीआयपीला तात्काळ प्रवेश दिला जातो, अशी टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, या आलिशान कारमध्ये नेमकं कोण होतं? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.