मुंबई: आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांनी देखील दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीचे अनेक खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत भाजप नेत्यांनी खळबळ उडवली होती. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबतचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काल (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यानंतर आज शिवसेना उबाठाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचले. संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात ही भेट झाली आहे.
शिवसेना उबाठाच्या खासदारांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यासाठी त्यांना वेळ देण्यात आली नव्हती. अखेर आज त्यांना भेटीसाठी वेळ मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे सात खासदार मोदींच्या भेटीसाठी दाखल झाले होते. या भेटीचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या राज्याच्या राजकारणात सध्याच्या घडीला सुरु असलेल्या घडामोडी पाहता मोदी आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्या गाठीभेटींद्वारे राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं जातं आहे का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
संसदेच्या अधिवेशना दरम्यान महाविकास आघाडीतील काही पक्षांचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. अधिवेशन सुरु असताना मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यामुळे मोदी आणि ठाकरेंच्या खासदारांची भेट ही महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क लावले आहेत.
अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे गुरुवारी सकाळी सहकुटुंब पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी शरद पवार यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात निकराची लढाई केल्यानंतर दिल्लीतील शरद पवार आणि अजित पवार यांची ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकीकडे या भेटीमुळे पवार वाद संपल्याची चर्चा सुरु झाली असताना या भेटीचा आणखी एक अर्थ काढला जात आहे. त्याचबरोबर अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत.