मुंबई : राज्याच्या राजकारणात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या एकत्रिकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व प्रकरणावरती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमावेळी अनेक बाबींवरती भाष्य केलं आहे. यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणारच असा दावा केला. राज आणि उद्धव हे दोघे भाऊ आहेत, दोघे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. दोघे एकत्र येतील हा मला विश्वास आहे. इतरांनी कुणी कितीही काहीही केलं तरी हे दोन्ही भाऊ एकत्र येतील असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर राज-उध्दव हे भाऊ एकत्र येण्यात कोणत्या अडचणी आहेत का? याबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नेमक्या कोणत्या अडचणी?
माझा कट्ट्यावरती बोलताना संजय राऊत म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र येण्यामागे कोणत्या अडचणी किंवा अडथळे असतील असं मला वाटतं नाही, किंवा असतील तर त्या इतक्या मोठ्या नाहीत की त्यांचा बाऊ करावा. मराठी माणसाच्या मनात आहे की, उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, त्यामध्ये अडचण किंवा अडसर असा काही आहे असं मला वाटत नाहीये. मी उद्धव ठाकरे यांना ओळखतो, नेते म्हणूनही ओळखतो आणि एक कौटुंबिक मित्र म्हणूनही मी त्यांना ओळखतो. त्यांचं मन अत्यंत साफ आहे. याबाबतीत आणि प्रत्येक बाबतीत ते स्पष्ट आणि पारदर्शक आहेत. गेल्या काही काळापासून त्यांनी या विषयावर कधी नकारात्मक भूमिका घेतली नाही. किंबहुना त्यांना भेटायला येणाऱ्या पक्षातील प्रत्येक प्रमुख नेत्यांना ते याबाबतीत बोलतात. तेव्हा ते या बाबतीत इतरांची मते समजून घेतात, त्यांचे विचार जाणून घेतात. ते विषय काढतात आणि त्यांचा मते समजून घेतात. कोणी काही मत मांडलं तरी ते नकारात्मक असं स्वतःचं मत त्यावर मांडत नाहीत. हे मी अनेकदा पाहिलं आहे. त्याचबरोबर राज्यातील मराठी माणसांची मते राज ठाकरे यांना ज्ञात आहेत, त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येण्यात काही अडचणी आहेत, असं मला वाटतं नाही, असे पुढे संजय राऊत म्हणाले आहेत.
वीज चमकेल
राज आणि उद्धव हे दोघे एकत्र येतील आणि वीज चमकल्यासारखं राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल. ज्यादिवशी वीज चमकेल त्यादिवशी महाराष्ट्राचे राजकारण बदलून जाईल. त्यामुळे दोन्ही भावांची ताकद राहिली नाही असं म्हणणाऱ्यांना ताकद दिसून येईल, असं संजय राऊत म्हणाले. राज आणि उद्धव एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही असं भाजपकडून म्हटलं जात आहे, त्यांना संजय राऊत यांनी उत्तर दिलं.
कॅफेवर जाणार का?
राज ठाकरे यांना भेटण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते त्यांच्या घरी जात. त्यावर टीका करताना संजय राऊत यांनी अनेकवेळा कॅफे असा उल्लेख केला होता. आता राज-उद्धव यांच्या युतीसाठी पुढाकार घेण्यासाठी तुम्ही कॅफेवर जाणार का असा खोचक सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, मला जायला काही अडचण नाही, राज ठाकरेही येतील. शिवाय आम्ही राजकारणी जे शब्दप्रयोग वापरतो (कॅफे) त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नका असं अप्रत्यक्ष संजय राऊत यांनी सांगितलं.