मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता बोचरी टीका केली होती. एका गाण्याचे विडंबन करत कामराने एकनाथ शिंदेंच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन निशाणा साधला होता. कॉमेडियनचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून शिवसैनिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. तर, काही शिवसैनिकांनी कुणाल कामराने (Kunal Kamra) जिथं हे गाणं गायलं तो स्टुडिओही फोडल्याचं दिसून आलं. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे विरोधकांनीही हा व्हिडिओ शेअर करत या टीकेचं समर्थन केलं. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी पुन्हा एकदा ते गाणं म्हटल्याचा व्हिडिओही समोर आला होता. त्यामुळे, आता विधिंमडळ सभागृहात याचे पडसाद उमटले असून कुणाल कामरा व सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. 

कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कविता केली. तीच कविता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्तत्या सुषमा अंधारे यांनी बोलून दाखवली. त्यानंतर, त्यांनी एक कविता केली. त्या कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका करण्यात आली. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांबाबत चुकीची भाषा वापरली आहे. त्यामुळे, सुषमा अंधारे यांनी दोन्ही सभागृहाचा अवमान आणि अपमान केला आहे. अंधारे यांची खालच्या पातळीवरील भाषा आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत कामरा यांनी केलेली खालच्या पातळीवरील टीका, यामुळे या दोघांविरोधात मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडत आहे, असे म्हणत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभागृहात कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग आणला आहे. 

विधानसभेतही हक्कभंग

कुणाल कामरा याचे गाणे पुन्हा सुषमा अंधारे यांनी म्हटले. मुख्यमंत्री यांनी निवेदन केले असतानाही परत ते गाणे म्हटले आहे, हा सभागृहाचा अपमान आहे. म्हणून, आपण सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग आणत आहोत, असे आमदार रमेश बोरनारे यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणताना म्हटले. 

हक्कभंग प्रस्तावानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये आमदार प्रवीण दरेकर यांनी माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यासंदर्भात निवेदन केल्याचे समजते, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणतं विभत्स कृत्य केलंय, मी सभागृहात 56 जण पायाला बांधून फिरते अशी भाषा केलीय का, मी कोणाचा एकेरी उल्लेख केला आहे का, मी सभागृहाबद्दल कोणाला खोटी माहिती पुरवली आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच, ज्या गृहमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी सभागृहात खोटी माहिती दिली, अंतरवालीतील लाठी हल्ल्यासंदर्भात सभागृहाला खोटी माहिती देणारे गृहमंत्री फडणवीसजी आणि कोकणातील रिफायनरी संदर्भात नागरिकांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणे शक्य आहे का, याची माहिती मला सभागृहाने द्यावी, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच, सभागृहात विभत्स हातवारे करणाऱ्या लोकांवरही तुम्ही हक्कभंग कधी आणणार आहात, असेही अंधारे यांनी म्हटले. दरम्यान, माझ्यावरील आरोपाचे मी यथावकाश उत्तरे देईल, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले. 

हेही वाचा

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले