नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने येऊ शकतात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 21 ऑगस्ट आहे. तर, 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही आघाड्यांकडे खासदारांचं पाठबळ नेमकं किती आहे हे स्पष्ट होईल. 

संख्याबळाचा विचार करता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपप्रणित एनडीएकडे आवश्यक खासदार आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीकडून उपराष्ट्रपती निवडणूक लढवली जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही. 2017 आणि 2022 यावेळच्या निवडणुकीत एनडीएनं विजय मिळवला होता.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. भाजपकडे लोकसभेत 240 आणि राज्यसभेत 102 खासदार आहेत. ससंदेतील एनडीएच्या पक्षांचं मिळून 457 खासदार सत्ताधाऱ्यांकडे आहेत. यामुळं एनडीएचे उमदेवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवणार हे स्पष्ट आहे.

इंडिया आघाडीचा विचार केला असता काँग्रेसकडे लोकसभेत 99 आणि राज्यसभेत 27 खासदार आहेत. इंडिया आघाडीच्या दोन्ही सभागृहातील खासदारांची संख्या 300 पेक्षा अधिक आहे. मात्र, या संख्याबळावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळणं अशक्य आहे.

राज्यसभेत भाजपचं संख्याबळ 100 पार

राज्यसभेत भाजपचं संख्याबळ पुन्हा एकदा 100 पेक्षा जास्त झालं आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून काही दिवसांपूर्वी उज्ज्वल निकम, हर्षवर्धन श्रृंगला आणि सी. सदानंदन मास्टर यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली होती. त्यामुळं भाजपची सदस्यसंख्या 102 झाली आहे. राज्यसभेत एनडीएकडे 134 खासदार आहेत. यामध्ये पाच खासदार राष्ट्रपती नियुक्त आहेत. राज्यसभेची सदस्यसंख्या 245 इतकी आहे. त्यामुळं सभागृहातील बहुमताचा आकडा 123 इतका होतो. राज्यसभेची राज्यघटनेनुसार सदस्यसंख्या राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडली जाणारी 238 आणि राष्ट्रपती नियुक्त सदस्य 12 अशी एकूण 250 इतकी आहे.

2022 मध्ये झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी आघाडीला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी 725 खासदारांनी मतदान केलं होतं. त्यापैकी 528 मतं जगदीप धनखड यांना मिळाली होती. तर, यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली होती. तर, 15 मतं बाद झाली होती. मार्गारेट अल्वा यांचा 346 मतांनी पराभव झाला होता.

दरम्यान, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी सत्ताधारी एनडीएकडून कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता आहे. भाजप स्वत:च्या पक्षातील नेत्याला संधी देणार की एनडीएतील घटक पक्षाच्या नेत्याला उपराष्ट्रपती करणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.