नवी मुंबई: नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, असे म्हणतात. पण मला ते देशाऐवजी गुजरातचेच पंतप्रधान वाटतात. कारण, भारतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले की, मोदी त्यांना गुजरातला घेऊन जातात. जपानच्या पंतप्रधानांनाही मोदी गुजरातलाच घेऊन गेले. अरे मग दिल्ली काय झ# मारायला आहे का? हा भेदभाव नाही तर  काय आहे? गुजरातच्या माणसाला एक वागणूक  आणि इतरांना एक वागणूक. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर महाराष्ट्रातील सर्व कारखाने गुजरातला घेऊन जातील, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. ते बुधवारी नवी मुंबईतील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या गुजरातधार्जिण्या धोरणांवर कडाडून टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळीच मविआच्या नेत्यांसोबत लोकसभेच्या जागावाटपासाठी भेट घेतली होती. त्यानंतर संध्याकाळच्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी मविआकडून भाजप आणि मोदींविरोधात करण्यात येणाऱ्या टीकेचा सूर अचूकपणे पकडला. 


प्रकाश आंबेडकर एरवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या हिंदुत्त्ववादी आणि वर्णव्यवस्थेला पाठिंबा देणाऱ्या धोरणांवर कडाडून टीका करतात. परंतु, आजच्या सभेत प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांची गुजरातधार्जिणी भूमिका आणि त्यांच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योग या मुद्द्यांवर प्रभावीपणे भाष्य केले. विशेष म्हणजे त्यांनी भाषणात पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणलं तर पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा. मला माहिती आहे की, तुम्हाला या गोष्टी पचवणे कठीण आहे. पण इथले कारखाने पळवलेत की नाही? मग उद्या पुन्हा ते पळवले जातील. मतांच्या रुपाने तुम्ही मोदींना त्या गोष्टीचं लायसन्स द्याल. त्यामुळे भाजपला मतदान करु नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित जनतेला केले.


मोदींच्या काळात भारत कर्जात बुडाला: आंबेडकर


या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही टीकास्त्र सोडले. मोदी म्हणतात, देशातील जनता माझा परिवार आहे. पण ते खोटारडे आहेत. विरोधी पक्ष त्यांचा खोटारडेपणा समोर आणत नाहीत. जागतिक बँकेच्या माहितीनुसार, मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 24 रुपयांचे कर्ज होते. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत दरडोई कर्जाचा आकडा 84  रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. एखाद्याला 10 हजार पगार मिळत असेल आणि बँकेला 10 हजार हप्ता द्यावा लागत असेल तर आपल्याकडे काही शिल्लक राहील का? अशावेळी आपण घरदार विकायला काढतो ना? 2026 साली देश कर्जात बुडालेला असेल. आपल्याला घरातील भांडी विकावी लागतील, अशी परिस्थिती ओढावेल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. 


आपण नवा हुकूमशाह निर्माण केलाय: प्रकाश आंबेडकर


आज देशात तपासयंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहेत. गेल्या 10 वर्षात सरकारने किती धाडी घातल्यात याचे आकडे द्यावेत. धाडी घालणे तुमचा अधिकार आहे. पण त्यापैकी कितीजणांना कोर्टाने शिक्षा सुनावली? उलट असं दिसतंय की, गंगेत स्नान केल्यासारखा चोर भाजपमध्ये साफ होऊन जातो. देशाची व्यवस्था एवढी बिघडवलेय की, कोर्टाला म्हणावं लागलं की मीच आता निवडणूक अधिकारी. चंदिगडमध्ये भाजपने काय केलं,भय निर्माण केलं. कोर्टातदेखील अधिकारी खरं बोलत नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मतं मोजली तेव्हा जिंकलेला माणूस हरलेला होता आणि हरलेला माणूस जिंकला होता, हे स्पष्ट झाले. आपण देशात नवा हुकूमशाह निर्माण केला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 


आणखी वाचा


प्रकाश आंबेडकरांनी जेवणाच्या ताटावर मविआच्या नेत्यांना मनातली खंत बोलून दाखवली, बैठकीत नेमकं काय घडलं?