नांदेड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरुन यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून कुणालाही सोडणार नसल्याचे म्हटले. मात्र, याप्रकरणी सातत्याने वाल्किम कराड यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणावरुनही संताप व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणीतील पीडित सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यासाठी, आज नांदेड विमानतळावर उतरुन ते परभणीला जातील, त्यासाठी विमानतळावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीतला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर दाखल झाले आहेत. यावेळी, नांदेड येथून पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी बीडच्या घटनेवरुन मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay munde) राजीनामा मागिताला आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशा मागणीचे निवेदनही बारामतीमधील मराठी क्रांती मोर्चाच्या सदस्याने दिले आहे. आता, काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही धनंजय मुंडेंच्या राजानाम्याची मागणी केली आहे. अजित पवारांवर ज्यावेळेला आरोप झाले , तेव्हा अजित पवारांना देखील मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून चौकशी झाली तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, असे पटोले यांनी म्हटलं आहे.
वाल्मिकी कराड हा माफीया आहे. मस्साजोग प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील सत्य परिस्थिती सांगितली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी टाइमपास केला, माफियाला ताकद देण्याचं काम केलं. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी आमची मागणी असल्याचं नाना पटोले यांनी नांदेडमधून म्हटलं.
मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली नवनीत कॉवत यांची भेट
दरम्यान, मृत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली आहे. पोलीस तपासासंदर्भात त्यांनी आढावा घेत उर्वरीत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना केल्या आहेत. एसपींच्या भेटीनंतर ते मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची देखील भेट घेणार आहेत.
हेही वाचा
छगन भुजबळांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस तोडगा काढणार; 40 मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय काय घडलं?