Uddhav Thackeray & Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू आक्रमकपण मांडणारे आणि मर्मवेधी वाग्बाणांनी विरोधकांना घायाळ करणारे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या आजारपणामुळे सक्तीच्या रजेवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडूप येथील घरी जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. उद्धव ठाकरे यांची गाडी राऊतांच्या मैत्री या बंगल्याबाहेर आली तेव्हा आमदार सुनील राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. आता आजच्या भेटीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी आज सकाळी ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब हेदेखील संजय राऊतांच्या भेटीला आले होते.  (Maharashtra Politics News)

Continues below advertisement

यापूर्वी संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या भेटीला त्यांच्या घरी आले आहेत. संजय राऊत यांना दुर्धर आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली आहे. संजय राऊत यांनी स्वत: सोशल मिडीययावरुन याबाबत माहिती दिली. सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. 

Uddhav Thackeray news: संजय राऊतांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, हल्ली मी रोज संजय राऊत यांना फोन करत नाही. मी आता रोज सुनील राऊतला संजयच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी छळत असतो. खूप दिवसांपासून त्यांना भेटायचं होतं, आज भेट झाली, चांगलं वाटलं. आज संजय खूप फ्रेश दिसला. संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील. नुसते दिसणार नाहीत तर तलवार घेऊन मैदानात दिसतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Continues below advertisement

Sanjay Raut news: दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा झाला

संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली होती. मात्र, 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला संजय राऊत हे बंधन झुगारुन घराबाहेर पडले होते. त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले होते.

आणखी वाचा

दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा झाला, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळ गाठून बाळासाहेबांना वंदन!