Uddhav Thackeray in Jalgaon : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 23 एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. येत्या 23 एप्रिलला उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे, आणि आता या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढला आहे. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचे आयेजन केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या यापुर्वीही छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याआधी झालेल्या सभांमधून राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
पक्षबांधणीसाठी सभा होत असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती. गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली, शिवसेनेतील काही आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले, यात पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचाही समावेश होता. आमदार किशोर पाटील शिंदे गटात गेल्यानंतर त्यांची चुलत बहीण म्हणजेच वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाला समर्थन दर्शवले, त्यानंतर पाचोरा तालुक्यात आमदार किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असे चित्र निर्माण झाले.
पाहा Teaser
उद्धव ठाकरे त्यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्याच बरोबर, उद्धव ठाकरे संध्याकाळी साडेपाच वाजता पाचोऱ्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचेही अनावरण करणार आहेत.
असा असेल उद्धव ठाकरेंचा जळगाव दौरा -
- सकाळी 11 वाजता - जळगाव विमानतळावर आगमन
- विमानतळावरुन खासगी वाहनाने पाचोरा तालुक्याकडे मार्गक्रमण
- सकाळी 12:30 वाजता - पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात आगमन
- दुपारी 1 ते 2 दरम्यान - भोजन
- दुपारी 2 ते 3 दरम्यान - विश्रांती
- दुपारी 3 ते 4 ची वेळ - राखीव
- दुपारी 4:30 वाजता - तात्यासाहेब आर.ओ.पाटील प्रयोगशाळेचे उद्घाटन
- संध्याकाळी 5.15 वाजता - शिवसेनेचे माजी आमदार (दिवंगत) आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे उद्घाटन
- संध्याकाळी 6.15 वाजता - एम.एम.महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा
- रात्री 8 वाजता - जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना
ही बातमी वाचा: