मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतून उद्धव ठाकरे, नीलमताई गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय केनेकर यांच्याह नऊ सदस्य मे महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यानिमित्तानं निवृत्त सदस्यांच्या निरोपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केलं. माझा पिंड हा राजकारणाचा नाहीये, माझा मूळ स्वभाव कलाकाराचा आहे. एवढं उत्तम वर्णन केल्यानंतर, एवढं तुम्ही जवळून ओळखता म्हणल्यानंतर ऐसी कौनसी बात थी और किसका हात पकडना पडा, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.

Continues below advertisement

सहकार्य करणाऱ्यांचे आभार

मी या विधिमंडळात मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, की आपल्या ध्यानी मनी नसतं आणि अचानक ती जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणं हे काय मर्दाचं लक्षण नसतं. ती जबाबदारी स्वीकारली होती. सर्वांना धन्यवाद, माझे त्यावेळचे आजी माजी सहकारी, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व शासकीय अधिकारी, मुख्य सचिवांपासून सर्व सचिव, सर्व प्रशासन, महसूल, पोलीस, आरोग्य सर्वच खात्यांच्या अधिकाऱ्यांना, आशा अंगणवाडी सेविका, सरपंच यांना धन्यवाद देतो. प्रशासनाचा गंध नसलेला माणूस मुख्यमंत्रि‍पदावर बसतो आणि राज्य चालवतो हे या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे  शक्य झालं नसतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

फडणवीस यांच्या जुन्या भाषणाची आठवण

मुख्यमंत्री महोदय आपण स्वत: मला निरोप द्यायला अगत्यानं उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो.  मला तो दिवस आठवला, काल एकूण जे काही विधिमंडळात जे घडलं ते बघितल्यानंतर तो दिवस का आठवला ते सांगतो. ज्ञानेश्वरांचं भारुड काठ्याच्या आळीवर वसली तीन गावे, दोन ओसाड एक वसेचिना, आता त्या गावची पाटिलकी आपल्याकडे आहे. आळीवरच्या तीन गावापैकी एक गाव आणि वर गेलं आहे. बाकी गावांचं काय झालं ते त्या गावकऱ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर ते बाराव्या आणि तेराव्या शतकात होऊन गेले. त्यावेळी ज्ञानेश्वरांनी रेड्यांकडून वेद वदवून घेतले होते. आता स्वार्थासाठी रेडे कापले जातात.

Continues below advertisement

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले नाशिकच्याबाबत आपण जी भूमिका घेतली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतोय. अतुल कुलकर्णी यांचं एक वक्तव्य आहे, जे पकडले जातात ते भोंदू, जे पकडले जात नाही त्यांचं काय? मला आपण सर्वांनी एकत्र मिळून भूमिका घ्यायला पाहिजे. सगळ्या राजकारण्यांनी ठरवलं तर बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला ताकद दिली पाहिजे. या देशात बुवा चमत्कार करु शकत नाहीत, युवा चमत्कार करु शकतात. युवा शक्तीला नीट पाठिंबा दिला तर या बुवांची दुकानं बंद झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम थोड्या लोकांच्या नशिबात

मुख्यमंत्रि‍पदानंतर मंत्रालयात प्रवेश केला होता, तो दिवस आठवतो. सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद होता. तो क्षण विसरु शकत नाही. मी वर्षा सोडून बाहेर पडलो तेव्हा हेलावलेला महाराष्ट्र बघून मी गहिवरुन गेलो होतो. हे सगळं प्रेम महाराष्ट्रानं दिलं, असं प्रेम थोड्या लोकांच्या नशिबात येतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. वर्षा सोडून मातोश्रीत आलो, मुख्यमंत्रिपद सोडलेलं नव्हतं. मातोश्रीत बसून कारभार करत होतो, मंत्री घरी येत होते. त्यांना घरी बसूनच पदं दिली होती. त्यावेळी अधिकाऱ्यानं विचारलं मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेताना होतात तसेच आता आहात कसं काय? मी म्हटलं जे आपलं नसतं स्वीकारण्यात आनंद होण्याची आवश्यकता नसते, जे आपलं नसतं ते सोडण्यात काय दु:ख आहे, असं सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील पहिला निर्णय रायगडाला निधी देण्याचा होता. तर, शेवटचा निर्णय औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर करण्याचा होता. बाळासाहेब ठाकरे औरंगाबादला संभाजीनगर म्हणायचे. तो काळ भयानक होता.करोना सारखं संकट कोणाच्या आयुष्यात येऊ नये. मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केलं. टास्क फोर्स करणारं आपलं पहिलं राज्य होतं. सहा वर्षांपूर्वी ऑक्सिजन सिलेंडरची कमी होती, आता गॅस सिलेंडरची कमी आहे. मुंबई मॉडेलचं जगभर कौतुक झालं. करोना काळातील कामाचं डॉक्यूमेंट करावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडून अजित पवार यांचं स्मरण

माझे कुटुंब, माझी जबाबदारी, शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन थाळी या कामांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. समृद्धी महामार्ग ते मेट्रोच्या काम थांबू दिलं नव्हतं. मराठी भाषा सक्तीची केली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी भाषा भवन, चौपाटीला मराठी रंगभूमी दालन करावं. वरळी डेअरीत जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र उभारा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अजितदादांनी खंबीर साथ दिली, त्यामुळे त्यांच्यासोबत स्नेह वाढला, चांगल्या कामाला त्यांनी आडकाठी केल्याचं आठवत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  

उद्धव ठाकरे यांनी वि.स. पागे यांच्यापासून विठ्ठलराव हांडे यांच्या नावांचा उल्लेख केला. विठ्ठलराव हांडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते, त्यांच्याकडे पुरेशी संख्या नव्हती. संख्याबळ नसताना त्यांना विरोधीपक्षनेते केलं होतं, मी बरोबर असेन तर आता विरोधीपक्ष नेते नियुक्त करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.