मुंबई: शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. ‘ठाकरे ब्रॅण्ड’ खतम करण्यासाठी बाहेर काही बॅण्ड वाजत आहेत. त्या बॅण्डवाल्यांचा बॅण्ड महाराष्ट्राची जनता वाजवेल, असे जोरदार भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशातील अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’ आहे. त्या धोंड्यास शेंदूर फासला तरी ‘शिवसेना’ हे नाव व धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार या धोंड्याला नाही. उद्धव ठाकरे यांनी परखडपणे सांगितले, ‘‘देशाला अशांत, अस्थिर आणि लोकांना सदैव चिंताग्रस्त ठेवायचे हेच भाजपचे धोरण आहे, पण लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येणार नाही. मोदींची 75 वर्षे भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिला आहे!’’

उद्धव ठाकरे यांची मुलाखत संयमी, तितकीच वादळी झाली. महाराष्ट्रात अनेक वारे आले आणि गेले, पण ‘ठाकरी’ वारे कायम आहेत. महाराष्ट्रातील मतलबी राजकीय वाऱयांवर ते मात करीत आहेत यासंदर्भावर मुलाखतीची सुरुवात झाली!उद्धवजी, महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड घडामोडी सुरू आहेत. जरी त्या घडामोडी दिसत नसल्या तरी जशा भूगर्भात काही हालचाली सुरू असतात किंवा पडद्यामागे काहीतरी नवीन पटकथा लिहिली जात असते, अशा पद्धतीच्या हालचाली महाराष्ट्रात आणि राज्याच्या बाहेर सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर किमान दोन वर्षांनी मुलाखतीसाठी भेटतो आहोत आणि ‘मन की बात’ आपण व्यक्त करणार आहोत. तुमच्या मनात काय भावना आहेत. तुमच्या मनातील बात काय आहे?

सुरुवातीला तुम्ही जो वेगवेगळ्या वाऱ्यांचा उल्लेख केलात, या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगेही आहेत. जे काही काळ वर जातात आणि गॅस गेला की खाली पडतात आणि ठाकरी वाऱ्यांचं म्हणाल तर ठाकरे म्हणजे काही वारे नाहीत. आमची पाळंमुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत. माझ्या आजोबांपासून आणि शिवसेनाप्रमुखांपासून हे नातं घट्ट आहे. आता मी काम करतो आहे. आदित्य आहे. सोबत राज आलेला आहे. ठाकरे म्हणजे सदासर्वदा संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही. समाजाच्या हितासाठी आम्ही तो करत आलो आहोत. आम्ही सत्तेत किती काळ राहिलो हा भाग वेगळा. पण सत्तेच्या विरोधात, किंबहुना जे अनिष्ट आहे, त्याविरोधात संघर्ष करत आलो. त्यातूनच हा ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे, तो आम्ही बनवलेला नाही. ठाकरे प्रामाणिक आहेत. लोकांसाठी लढणारे, जनतेच्या व्यथा-वेदनांना निर्भीडपणे वाचा फोडणारे आहेत. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्या सोबत राहिली आहे.

हा जो ठाकरे ब्रँड आपण म्हणतोय, ‘ब्रँड’ हा शब्द इंट्रेस्टिंग आहे. जगात अनेक मोठमोठे ब्रँड व्यवसायात, उत्पादनात, व्यापारात येतात. मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात. तरी हा ठाकरे ब्रँड 50 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाच्या राजकारणात टिकून राहिला.

– ठाकरे हा नुसता ब्रँड नाही. हा ब्रँड म्हणजे महाराष्ट्राची, मराठी माणसाची, हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न काहींनी केला. पुसू इच्छिणारे पुसले गेले. अनेक आले, अनेक गेले. जनतेने त्यांना पुसून टाकले.

असं काय आहे ठाकरे ब्रँडमध्ये? तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन समाजकारणात, राजकारणात आहे.

– ते आम्ही कसं सांगणार? ते जनतेने सांगायला पाहिजे. आज माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. तरीसुद्धा कुठेही गेलं तरी लोक प्रेमाने, आपुलकीने स्वागत करतात. बोलायला येतात. जे घडतंय त्याबद्दल संताप, हळहळ व्यक्त करतात. काही झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगतात.

हा ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्रात अनेक लोक कामाला लागलेत की, आता आम्ही हा ब्रँड संपवणारच.

होय, खरं आहे. ठाकरे ब्रॅण्ड संपवण्यासाठी अनेक बॅण्ड वाजताहेत. कारण त्यांना स्वतःशिवाय देशात कोणतंही अन्य नाव नको आहे. स्वतःची तुलना ते देवाबरोबर करायला लागलेत. बॅलेट पेपरवर मतदान घ्या, मग काय व्हायचं ते होऊ द्या!