मुंबई : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीने आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिलं भाषण करत, मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये  जोष भरला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केला. 


यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर सेक्युलर सिव्हिल कोडवरुन टीकास्त्र सोडलं. मोदींनी लाल किल्ल्यावरुन सेक्युलर सिव्हिल बिलाबाबत भाष्य केलं. आता तुम्हाला सेक्युलर शब्द आठवला म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्राबाबू, नितीश कुमारांच्या मांडीला मांडी लावून बसलात, मग तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का? मग उगाच आगी लावण्यासाठी म्हणून वक्फ बोर्डाचं विधेयक आणलंत. जर आणलं असेल तर बहुमताच्या जोरावर ते मंजूर का केलं नाही? असे सवाल उद्धव यांनी विचारले. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले? (Uddhav Thackeray speech)


बऱ्याच दिवसापासून आपल्या तीन पक्षाची आणि मित्र पक्षाची बैठक घेण्याचा मुहूर्त लागत नव्हता. आज मुहूर्त लागला. येता येता बातमी पाहिली निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे. त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक सुद्धा आज जाहीर करावी. महाराष्ट्र धर्म रक्षणाची, स्वाभिमान रक्षणाची लढाई आहे. लढाई अशी लढाईची की एक तर तू राहशील नाहीतर मी राहील! होऊन जाऊ दे. सत्ताधारी बघताय, डुबक्या मारून पवित्र होता येईल का? मुख्यमंत्रि‍पदासाठी तुम्ही जो चेहरा द्याल त्याला पाठिंबा असेल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. 


भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला. ज्याचा जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरवलं जायचं. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या, पण यामध्ये असं नको. आधी ठरवा आणि मग पुढे जा कारण त्यामध्ये धोका जास्त आहे. योजना पोहोचवणाऱ्याला 10 हजार महिना दिला जातोय, त्यासाठी दूत नेमले. पण हा लोकांचा पैसा आहे, अशा योजनांमध्ये राज्याची लूट हे करतायत.  


आपण नाही होऊ शकणार दूत? आपण अडीच वर्ष काय काम केलं ते लोकांपर्यत पोहोचवा. होऊन जाऊ दे चर्चा, तुम्ही काय केलं आम्ही काय केलं, याची माहिती देऊ. विधानसभा निवडणूक १ महिना पुढे ढकलायचं सुरु आहे. कारण आपलं काम जनतेने विसरायला पाहिजे. 


लाडकी बहीण योजना आणली, पण पैसा कुठे? IAS अधिकारी सांगतायत साहेब तुम्ही लवकर या. यांचं खरं रूप काय? गद्दार सरकार पडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये. 


 या जन्मी किंवा पुढच्या जन्मी आपल्याला न्याय मिळेल


सध्या कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचा खटला सुरु आहे. या जन्मी किंवा पुढच्या जन्मी आपल्याला न्याय देवतेचा आशीर्वाद मिळेल. आपला निकाल 50 वर्षात नक्कीच लागेल. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं भाषण मी ऐकलं नाही, भूतकाळात जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा राम शास्त्री प्रभुणे आठवतात. चंद्रचूडसाहेब तुम्ही जे काय केलं आहे त्याची सुद्धा नोंद भूतकाळात होईल.


वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरुन हल्ला


मुस्लिम समाजाने आपल्याला भरभरून मतदान केलं, कोरोनामध्ये मी या समाजसाठी काम केलं. NRC, CAA मध्ये सुद्धा आम्ही मुस्लिमांसोबत होतो. तुम्ही आगी लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणलं. बहुमत असताना तुम्ही मंजूर का केलं नाही? सेनेचे खासदार सभागृहात उपस्थित नव्हते कारण मी दिल्लीत होतो. 


वक्फ बोर्ड असो किंवा हिंदू संस्थांनाच्या जागा असतील तिथे वेडंवाकडं होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड विधेयकाखाली तुम्ही जर त्या जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल तर त्याला आम्ही विरोध करू. 


मोदींची गॅरंटी चालत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी जर हे प्रश्न विचारात असाल तर आजच निवडणूक जाहीर करा. तुम्ही राज्यात ओबीसी मराठा वाद लावलाय. मराठा आरक्षण बिल लोकसभेत आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. समाजासमाजात आगी लावू नका. मुंबईत सुद्धा अनेक अडचणी आहेत. 
सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून तुम्ही मोदी शाह मुंबईला पाहत आहेत. 


जागावाटपवरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. काँग्रेसचा हात, सेनेची मशाल, आणि पवार साहेबांचा हातात तुतारी असलेला मावळा गावागावात पोहोचवा. मी पुन्हा एकदा सांगतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा पण जागा वाटपात भांडण करू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. 


Uddhav Thackeray speech Video : उद्धव ठाकरे यांचं भाषण



 


संबंधित बातम्या


मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही जो चेहरा द्याल त्याला पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची घोषणा