रत्नागिरी: मनसेचे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra modi) पत्र लिहून देशभरात सुरू असलेल्या तिरंगा रॅलीवर प्रश्न उपस्थित केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपण जिंकलेलं नाही, तर या युद्धजन्य परिस्थितीला युद्धविराम मिळाला आहे. त्यामुळे, हा जल्लोष करणे योग्य नसल्याचे सांगत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी भाजपकडून सुरू असलेल्या तिरंगा रॅलीवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत हा जल्लोष थांबवण्याची विनंतीही केली आहे. आता, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी अमित ठाकरेंच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे. तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नसून भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅली काढली जात असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
हा जल्लोष नाही, तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत. भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवंदना देण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काही नाही. जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा एक विधायक रॅली आहे, असेही सामंत म्हणाले. दरम्यान, युद्ध अजून संपलेलं नाही… अशा मथळ्याखाली अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.