मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 20 खासदारांनी स्वतंत्र गट निर्माण केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे तृणमूलच्या खासदारांची चर्चा असताना, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) खासदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला केवळ 4 खासदार प्रत्यक्षात उपस्थित होते. तर, इतर 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याने तर्क-वितर्क काढले जात आहेत. मात्र, ऑपरेशन टायगरबाबत आता शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी महत्त्वाची माहिती दिली.  

Continues below advertisement

उबाठाच्या कोणत्याही खासदारासोबत संपर्क नाही, अशी कोणतीही मीटिंग झाली नाही. आम्हाला ऑपेरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच, संजय राऊत यांच्या पेशन्सला दाद देत त्यांनी उबाठाचं अस्तित्व टिकवलं आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, एकप्रकारे उदय सामंत यांनी ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात नसल्याचेच सूचवलं आहे. 

आता, ठाकरेंच्या आमदारांचीही बैठक

खासदारांची बैठक घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. सोमवार 22 जून 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता "शिवालय", मंत्रालयासमारे, मुंबई येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधीमंडळ पक्षाच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी, वरील बैठकीस सर्व सन्माननीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे पत्रच पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांच्या सहीने जारी करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, स्वागत

दरम्यान, राष्ट्रहितासाठी घडामोड होत असेल तर चांगले आहे, ⁠उबाठाचे खासदार देश हितासाठी सोबत येत असतील तर स्वागत आहे, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया दिली. तसेच, ⁠अटल बिहारी वाजपेयींचे सरकार असताना काँग्रेसने काय केलं, असेही त्यांनी म्हटलं.

संजय राऊत शरण गेले नाहीत - सावंत

संजय राऊत शरण गेले नाही, खमक्या नेता आज कार्यक्रमाला आला आहे, कामगाराला न्याय देणारी आमची भारतीय कामगार सेना आहे, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी संजय राऊतांचे कौतुक केले. तसेच, शिवसेना पक्ष चिन्ह हे लोक घेऊन गेले, अजून न्याय मिळाला नाही, 4 वर्ष झाले. एखादा गट पक्षातून फुटतो त्याला दुसऱ्या पक्षात मर्ज व्हावं लागतं जे आता बंगालमध्ये झालं. पण, येथे यांनी आपलीच शिवसेना घेऊन गेले, ते दुसऱ्या पक्षात मर्ज झाले नाहीत, असे म्हणत अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा उपस्थित केला. 

हेही वाचा

अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका