Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यातील सरकार हे घटनाबाह्य, अनैतिक आणि बेकायदेशीर असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तर राज्याचे आधीचे राज्यपाल हे राज्यपाल नसून भाज्यपाल असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी भगतसिंह कोश्यारींना (Bhagat Singh Koshyari) लगावला.


सरकार पाडण्यात राज्यपालांचा मोठा हात


आदित्य ठाकरेंनी पुर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर (Bhagat Singh Koshyari) ताशेरे ओढलेत. सरकार पाडण्यात राज्यपालांचा मोठा हात असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. पूर्वीचे राज्यपालांनी राज्यपाल म्हणून  नाही, तर पक्षाचा माणूस म्हणून केल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यपाल कोश्यारींनी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. राज्यापल हे राज्यात हुकुमशाही करण्यासाठी नेमले गेले होते का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तर राज्यांना निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार नाही का? असा सवाल करत राज्यपालांच्या हस्तक्षेपावर आदित्य ठाकरेंनी कडाडून टीका केली आहे.


40 आमदार अपात्र होणारच


सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असताना दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी 40 आमदारांबाबत भाष्य केलंय. 40 गद्दारांचा चाललेला खेळ लवकरच संपणार असं ते म्हणाले. 40 आमदार अपात्र होणार म्हणजे होणारच, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. सत्याचाच विजय होणार यावर विश्वास असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.


...तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जा


राज्यात DCM (उपमुख्यमंत्री), म्हणजेच दुसरे मुख्यमंत्री (CM) असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) टोला लगावला. दुसरे मुख्यमंत्री बोलतील त्याप्रमाणेच सगळं चालतं असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून दुसरे मुख्यमंत्री सूचना करतात आणि राज्य चालतं, असं ते म्हणाले. तर, सरकारमध्ये लाज आणि नैतिकता उरली असेल तर राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा निवडणुकांना सामोरं जायला पाहिजे, असं मत व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) एक प्रकारे आव्हान दिलं आहे.


पुढील घडामोडी देशासाठी आणि संविधानासाठी महत्त्वाच्या


देशात लोकशाही संपली आहे आणि हुकुमशाही वाढत चालली आहे,  असंही आदित्य ठाकरे म्हणाले. पुढची पाऊलं आणि ज्या घडामोडी घडतील त्या देशासाठी आणि संविधनासाठी महत्त्वाच्या असतील, असा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केला. तर, आमदार भरत गोगावलेंची (Bharat Gogavale) प्रतोदपदी निवड बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि त्यांचा व्हीप घटनाबाह्य असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. त्यामुळे, अध्यक्षपदी सुनील प्रभुंच्या (Sunil Prabhu) नावाचा उल्लेख असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा:


Maharashtra Political Crisis : घटनापीठाने झापल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया