मुंबई: लोकसभा निवडणुकीत आलेले ठाकरे गटाचे नऊपैकी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Susham Andhare) यांनी म्हस्के यांचा चांगलाच समाचार घेतला. खोक्यांच्या बळावर बेईमानी करुन अपघाताने खासदार झालेल्या नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी निष्ठावान आणि इमानी लोकांविषयी बोलू नये. पण अडचण अशी आहे की, नरेश म्हस्के यांच्या अंगातील छिल्लोर आणि थिल्लरपणा स्वभाव आहे तो गेलेलाच नाही. आता आपण खासदार झालोय, आता आपण थिल्लरपणा करु नये, थोडं गांभीर्याने बोललं पाहिजे, आपल्या बोलण्याला वजन असलं पाहिजे, आपण जे वक्तव्य करतो त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे असले पाहिजेत, या गोष्टींचे नरेश म्हस्के यांना भानच नाही. त्यामुळे नरेश म्हस्के हे अशाप्रकारची वक्तव्यं करत असल्याचे अंधारे यांनी म्हटले. 


नरेश म्हस्के म्हणतात, त्याप्रमाणे आमचे दोन खासदार त्यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी थेट या खासदारांची नावंच जाहीर केली पाहिजेत. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, असे करु नये. खासदार असलेल्या माणसाला हे शोभत नाही. कदाचित नरेश म्हस्के यांनाच आपण खासदार झालो, यावर विश्वास बसत नसेल. पैशांच्या जोरावर खासदारकी विकत घेतली त्याच्याकडून गांभीर्याने बोलण्याची अपेक्षा नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 


नरेश म्हस्के यांनी कितीही हुजरेगिरी किंवा लांगुलचालन केलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना केंद्रात मंत्रिपद देणार नाहीत. त्यांच्या पक्षात अगोदरच प्रतापराव जाधव मंत्रि‍पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. त्यामुळे नरेश म्हस्केंनी कितीही आगाऊपणा केला तरी त्यांना मंत्रिपद मिळणार नाही. कारण मुख्यमंत्री शिंदे आपल्या पोराशिवाय इतरांकडे बघणार नाहीत. आम्ही एखाद्या छिछोर माणसावर विश्वास ठेवून आमच्या खासदारांवर शंका घेण्याचे कारण नाही. आरोप करणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा पाहिली पाहिजे. दहा पक्ष बदलण्यासाठी तयार असलेल्या नरेश म्हस्के यांना काँग्रेसमध्ये जाताना राजन विचारे यांनी उचलून आणलं होतं. मुख्यमंत्र्‍यांच्या वसुलीची कामे नसती तर नरेश म्हस्के खासदार म्हणून निवडून येऊ शकले नसते, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.


नरेश म्हस्केंचा नेमका दावा काय?


ठाकरे गटाच्या या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे. मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले.  मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले होते.


 



आणखी वाचा


Shivsena: लोकसभेला मदत करतो, विधानसभेला आमचा विचार करा; शिंदे गटातील आमदारांची ठाकरेंना ऑफर; सचिन अहिरांचा गौप्यस्फोट