मुंबई: परभणीत भाजपने निळे गमछे गळ्यात घालून आपल्या लोकांना रस्त्यावर उतरवून तोडफोड केली. मात्र, पोलिसांनी ज्या लोकांचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही, अशा लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींमध्ये समावेश असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीस कोठडीत अमानुष मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 


सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता, तो लॉ अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला. तो न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याचा मृत्यू पोलीस कोठडीतील अमानुष मारहाणीमुळे झाला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी  केला


यावेळी सुषमा अंधारे यांनी  पोलीस खात्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आमची मागणी आहे की, पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक तुरनर, स्थानिक गुन्हे शाखेचे गोरगांड या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करुन स्वतंत्र चौकशी करावी. तसे केले नाही तर मला दोन दिवसांनी परभणीत येऊन बसावे लागेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.


अख्ख्या कुटुंबावर गुन्हे दाखल, जामीन घ्यायला कोणी शिल्लकच ठेवलं नाही: सुषमा अंधारे


यावेळी सुषमा अंधारे यांनी मृत सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा असलेला फोटो सगळ्यांना दाखवला. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत संशय व्यक्त केला. विजय वाकोडे हा जुना पँथरचा माणूस आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक व्याधीमुळे विजय वाकोडे जागेवरुन हलू शकत नाहीत. हा माणूस रस्त्यावर येऊन तोडफोड करु शकत नाही. तर रवी सोनकांबळे हा माजी नगरसेवक होता. हा अत्यंत समंजस व्यक्ती आहे. रवी सोनकांबळे याने अनेक वर्षे परभणीतील शांतता कमिटीत काम केले आहे. पोलिसांनी एकाच कुटुंबातील सगळ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. जेणेकरून जामीन घ्यायला कोणी शिल्लकच राहिले नाही पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.



आणखी वाचा


सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल