मुंबई : महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आजची पत्रकार परिषद महत्वाची असून देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. या विषयावर सक्तीचं राजकारण बाजूला ठेवून ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी आशा मला आहे, असे म्हणत सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव घेऊन 145 कोटींच्या ड्रग्जचे गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेंचे भाऊ असून त्यांच्या साताऱ्यातील सावरी गावात असलेल्या रिसॉर्टमध्ये 45 किलो ड्रग्ज (Drugs) सापडल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यानंतर, प्रकाश शिंदे यांनी एबीपी माझावर आपली पहिली प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. 

Continues below advertisement

साताऱ्यातील हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे, या शेडचा मालक गोविंद सिंदकर. याच्या शेडची चावी ओंकार दिघे याने घेतली अशी माहिती गोविंद याने दिली. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांचं आहे, याप्रकरणी ओंकार दिघे याला ताब्यात घेतलं आणि सोडलं. पण, का सोडलं हे अजून माहीत नाही. सातारा पोलिसांना का कळवलं नाही. मुंबई पोलिस का गेले? असे म्हणत संबंधित प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले. त्यामुळे, हे प्रकरण अधिक गंभीर झाले असून प्रकाश शिंदे यांनी सुषमा अंधारेंचे सर्व आरोप फेटाळले आहेत.  

आरोप खोटे, राजकीय षडयंत्र

सुषमा अंधारे यांचे आरोप साफ खोटं आहे, हे विरोधकांचे षडयंत्र आहे. ज्या स्पॉटवर हे ड्रग्स सापडलं आहे, तिथून तीन ते साडे तीन किमी लांब ती जागा आहे. पोलिसांच्या अहवालानुसार सर्वांनी माहिती घ्यावी. माझ्या जागेशी त्या घटनेचा काहीही संबंध नाही. तो माझा रिसॉर्ट नसून गेल्या 6 महिन्यांपूर्वी रणजीत शिंदे यांना ती जागा दिलेली आहे, असेही प्रकाश शिंदे यांनी म्हटले. तसेच, तिथे रिसॉर्ट नसून ती केवळ जागा आहे. साताऱ्याच्या एसपींना मी कधी बघितलं नाही, किंवा त्या एसपींनी देखील मला कधीही बघितलेलं नाही. 

Continues below advertisement

पोलिस तपासात सगळ समोर आलंय

मी नगरसेवक म्हणून एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देत राहतो. पोलिसांनी धाड मारली हे चांगलं आहे. पोलिस तपासात सगळं समोर आलंय, जे ड्रग्ज सापडलं त्यानुसार कारवाई केली पाहिजे. मात्र, माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि राजकीय षडयंत्र असल्याचंही प्रकाश शिंदे यांनी म्हटलं. 

सुषमा अंधारे काय म्हणाल्या

सुषमा अंधारेंनी म्हटले की, 13 डिसेंबर रोजी सावी गावात कारवाई झाली, सुरुवातीला मुकूंद गावात कारवाई झाली होती. त्याचे धागेदोरे पुण्यात आले, यात विशाल मोरे याला ताब्यात घेतले होते, त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून सावरी गावाची माहिती मिळाली. या गावात पोलिसांचे पथक पोहोचले. मी स्वतः सावरी गावात जाऊन आले आणि हातात काही धक्कादायक माहिती मिळाली. हे कोयनेचे बॅकवॉटर आहे, इथे स्विमिंग टॅक तयार होत आहे. रिसॉर्ट होत आहे, इथून जवळ असणाऱ्या पत्राच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. इथे 75 लाख खर्च करून रस्ता तयार करण्यात आला. इथे गाव नाही, माणूस नाही तर या शेड जोडणारा रस्ता का तयार करण्यात आला, असा सवाल सुषमा अंधारे यांनी हातातील फोटो दाखवत उपस्थित केला. या रिसॉर्टमध्ये 7 ते 8 रूम बांधून तयार आहेत, इतर अमेनियिज तयार होत आहेत, इथे डस्टर गाडी आहे. या कारवाईत 45 किलो ड्रग्स सापडले, याची किंमत 52 ग्राम 10 लाख लागतात तर 45 किलो ड्रग्सची किंमत 145 कोटी एवढी आहे, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

रणजीत शिंदे हा एकनाथ शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे, एकनाथ शिंदे ज्या गावाचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी समोर आल्या. रणजीत शिंदे कुठे आहे,? त्याचं नेमकं काय झालं? रणजीत शिंदे याने हे हॉटेल का चालवावे, त्याचा काय संबंध असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले आहेत. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत, ठाण्यातून 2017 साली त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी की 3 लोकं राहत होती. आसाम राज्यातून त्यांना याठिकाणी कुणी आणले असेल? यातले काही बांगलादेशी आहेत असही म्हटलं जातं? ही तीन लोकं कसलं काम करत होती, असे सुषमा अंधारे यांनी विचारले. 

ती तीन लोकं कोणती, त्यांची नावे FIR मध्ये का नाहीत

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती लपवली. ही लोकं कोण आहेत याची माहिती त्यांनी दिली आहे. या शेडमध्ये काय काम चालायचं. स्थानिक लोकांनी सांगितलं की, ही लोकं भारतीय नसावीत. त्यांच्या चेहऱ्याची ठेवणं वेगळी दिसते. या तीन लोकांना जेवण प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेलमधून जात होते. या तीन कामगारांना या पंचतारांकित हॉटेलमधील जेवण कसे परवडत होते? अर्थात ही माहिती पोलिसांच्या तपासातील आहे. पोलिसांनी पहाटे कारवाई केली. 145 किलो ड्रग्सचा विषय आला आहे. ज्या तीन लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे, त्यांची नावे FIR मध्ये नाहीत. त्यांची नावे का नाहीत? असेही अंधारे यांनी म्हटले. 

हेही वाचा

एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप