मुंबई : आर. आर. पाटील (R R Patil) यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची परवानगी देऊन केसाने गळा कापला, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कवठे-महांकाळ येथे झालेल्या सभेत केला होता. यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांच्या वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याचं म्हटलंय. तसेच पाटील कुटुंबाची मी माफी मागीतल्याचीही माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आर. आर. पाटील हे माझ्या भावासारखे होते. त्यांचे 9 वर्षापूर्वी निधन झाले. अजित पवार यांनी त्यांच्या निधनानंतर असे आरोप करणे चुकीचे आहे. मला या आरोपामुळे मला खूप दुःख झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना 70 हजार कोटींचा प्रश्न विचारला गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची मागितली माफी
त्या पुढे म्हणाल्या की, मी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाशी चर्चा केली. मी त्यांना सॉरी म्हटले. कारण मला खूप दुःख झाले आहे. आज त्यांची आई, त्यांची पत्नी, मुलं हयात आहेत. त्यांना या आरोपांमुळे काय वाटलं असेल? हे वाटूनच मी त्यांना सॉरी म्हटलं. आर. आर. पाटील इमानदार नेते होते. विरोधकांनी मागणी केल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी संमती दिली कारण जर आरोप खोटे असतील तरीही ते झाले आहेत त्यामुळे आर. आर. पाटील यांनी निष्पक्षपणे चौकशी लावली असेल ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, आता आरोप होणं वेदनादायी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार म्हणाले होते की, 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र, माझ्या सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर मला बोलवून आर आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आणखी वाचा