Sunetra Pawar On Rohit Pawar: पुण्याच्या पालकमंत्र्यांना अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखं काम करता येत नाही, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद घेतलं तर पुण्याचं वाटोळं होईल असा दावाही रोहित पवारांनी केला होता. तसेच पुण्याला जरा कठोर पालकमंत्री द्या किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना ताकद द्या, असं आवाहन रोहित पवारांनी केलं होतं. तसंच दादांची जागा कुणही घेऊ शकत नाही असंही रोहित पवारांनी म्हटलं. मात्र सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन टीका होताच रोहित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली.

Continues below advertisement

पुण्याच्या पालकमंत्र्यांना दादासारखं काम करता येत नाही, पुण्याला कठोर पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा पवारांना ताकद द्या, असे म्हणत आमदार रोहित पवार सुनेत्रा पवार यांच्या कार्यशैलीवरुन थेट हल्लाबोल केला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद घेतल्यास पुण्याचं वाटोळं होईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं होतं. रोहित पवारांच्या या विधानावरुन अजित पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली. यानंतर आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देताना रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांची व्यक्तिगत माफी मागतो, असं रोहित पवार म्हणाले. (NCP Politics News)

रोहित पवारांचं विधान, सुनेत्रा पवारांनी प्रश्न विचारताच काय केलं? (Sunetra Pawar On Rohit Pawar)

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यात तातडीची बैठक घेतली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीला उपस्थित होते. सदर बैठक संपल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरीच्या पोलीस आयुक्तांना काही सूचना दिल्या आहेत. सर्व केसेस फास्ट ट्रक घेण्यासंदर्भात सूचना दिल्यात आहेत, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यानंतर रोहित पवारांनी केलेल्या विधानावर प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांनी त्यावर बोलण्यास नकार दिला.

Continues below advertisement

सुनेत्रावहिनींना वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो- रोहित पवार (Rohit Pawar On Sunetra Pawar)

मी बारामतीकर आहे, पुणे जिल्ह्याचा नागरिक आहे. एक पुणेकर नागरिक म्हणून मी अजित पवारांना पालकमंत्री म्हणून पाहिलं आहे. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना पाहिलं आहे. त्यामुळे, मी पालकमंत्रीपदाबाबत माझं मत मांडलं होतं. तरीही माझ्या आक्रमक शब्दांबद्दल सुनेत्रावहिनींना वाईट वाटलं असेल तर मी त्यांची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र मी चुकीचं बोललो नाही, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित यांच्या विधानावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? (Supriya Sule On Rohit Pawar)

काल रोहित पवारांनी जे वक्तव्य केलं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्या राष्ट्रवादीच्या महिला मोर्चा काढत आहेत. त्यांना मी विनंती करते की, तुम्ही चॅनेल पाहा...रोहित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे इथेच विषय संपतो. त्यांची इच्छा असेल तर मी रोहित पवारांच्यावतीने बोलते. तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर हात जोडून माफी मागते आणि दिलगिरी व्यक्त करते. अजून त्यांना काय हवं असेल तर तेही करेन. सुनेत्रा पवार या अजित पवार माझ्या मोठ्या भावाची बायको आहे. आमच्याकडे संस्कार आहेत की जे मोठे आहेत त्यांची माफी मागायला हरकत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.  

आदिती तटकरेंची रोहित पवारांवर टीका- (Aditi Tatkare On Rohit Pawar)

रोहित पवारांनी केलेल्या सुनेत्रा पवारांच्या विधानावरुन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या आदिती तटकरे यांनी टीका केली आहे. आदरणीय अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, स्वतः दुःखात असूनही आदरणीय सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राला आधार दिला. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी दादांच्या पश्चात पुण्याचे पालकत्व समर्थपणे सांभाळत विकासाचा वेग कायम ठेवला. लोकाभिमुख विकासातून त्या आदरणीय दादांचा वारसा पुढे नेत आहेत. मात्र, पुरोगामी विचारांचा दावा करणाऱ्यांनाच आज महाराष्ट्राचे महिला नेतृत्व खुपत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या मातृत्व, कर्तृत्व व नेतृत्वाचा वारसा पुढे नेणाऱ्या सुनेत्राकाकींना अशा टीकेने फरक पडणार नाही. उलट पुरोगामी मुखवट्यांआडचे चेहरे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी अधिक ताकदीने उभा राहील, असा मला विश्वास आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 

संबंधित बातमी:

मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...