Subhash Wankhede: हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांची शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटातून (Thackeray Group) हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, यासंदर्भात सुभाष वानखेडे यांना पत्रकाद्वारे कळवल्याबाबतही ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.                                                                                       


हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. 


सुभाष वानखेडे कोण? 


हदगावच्या ल्याहरी गावातून सरपंच पदापासून वानखेडे यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतही ते सदस्य होते. त्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर हदगाव विधानसभा मतदार संघातून (Hadgaon Assembly Constituency) त्यांनी तीन वेळा विजय मिळविला होता. तर 2009 मध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघात तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा तब्बल 75 हजार मतांनी पराभव करीत पहिल्यांदा दिल्ली गाठली होती. 2014 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे राजीव सातव यांच्याकडून 1400 मतांनी निसटता पराभव झाला होता. पराभवानंतर वानखेडे हे भाजपमध्ये गेले होते. (Hingoli Lok Sabha Election) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी 2019 मध्ये हिंगोली लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी सेनेच्या हेमंत पाटील यांनी त्यांचा तब्बल 2 लाख 77 हजार मतांनी पराभव केला होता. तत्पूर्वी वानखेडे यांनी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदार संघातून भाजपाचे तिकीट मिळविण्याची तयारी सुरू केली होती. त्यावेळी जवळपास त्यांचे तिकीट निश्चितही झाले होते. तसेच, सेनेकडूनही त्यांना ऑफर होती. परंतु पुन्हा ते काँग्रेसच्या गटात गेले होते. तेव्हापासून गेली अडीच वर्षे ते काँग्रेसमध्येच होते. त्यानंतर वानखेडेंनी ठाकरेंचं शिवबंधन हातात बांधत घरवापसी केली होती.