मुंबई :  राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं तर काही ठिकाणी अजून मतदान सुरु आहे. आज नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया आज झाली. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं उद्या होणारी मतमोजणी लांबणीवर पडली आहे. राज्य निवडणूक आयोग आचारसंहिता शिथील करण्याच्या मागणीसाठी पुन्हा कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Continues below advertisement

State Election Commission : जिथं मतदान झालं तिथं आचारसंहिता शिथील होणार? 

सूत्रांच्या माहितीनुसार राज्य निवडणूक आयोग आचारसंहिता शिथील करण्यासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल 21 तारखेला घोषित करावेत तसेच निकाल लागू होईपर्यंत आचारसंहिता कायम ठेवावी, असे आदेश कोर्टानं दिले आहेत. 

दरम्यान ज्या भागातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या परिसरातील आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोग परवानगी मागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या मागणीवर कोर्ट काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेय.

Continues below advertisement

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. राज्य निवडणूक आयोगानं 4 नोव्हेंबरला 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, काही ठिकाणची मतदानाची प्रक्रिया न्यायालयीन कारणांमुळं लांबणीवर टाकण्यात आली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यातील 24 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर, 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे.  

264 नगरपरिषद आणि नगरपचंयातीच्या मतदानासाठी एकूण 12  हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

राज्य भरात उत्साहात मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जातात. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक पार पडत असल्यानं सर्वत्र मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी मतदानाची वेळ पार पडल्यानंतर देखील मतदानासाठी रांगा दिसून आल्या.

मनमाडमध्ये  रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरु राहण्याची शक्यता

मतदानाची वेळ संपल्यानंतर ही मनमाड शहरातील काही मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी असून विशेषत एमजी कॉलेजच्या मतदान केंद्रावर शेकडो मतदारांनी गर्दी केली. साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर मुख्य गेट बंद करण्यात आलं असून मतदान केंद्राच्या आत मध्ये असलेली गर्दी पाहता रात्री 9वाजे पर्यत मतदान प्रक्रिया सूरू राहण्याची शक्यता आहे.