Sonam Wangchuk Protest Marathi News: नीट पेपरफुटी प्रकरणातील (NEET Exam Paper Leak) दोषींविरुद्ध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk Protest) यांनी जवळपास 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 1.30 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. उपोषण थांबवण्याची माहिती स्वत: सोनम वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.
एकीकडे सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत सुरूच राहणार आहे, असं कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या 3 अटी केंद्र सरकारने मान्य केल्या. परंतु या मागण्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही उल्लेख नाहीय. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय सोनम वांगचुक यांचा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यावर आता सोनम वांगचुक यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिलं आहे.
माझ्याकडे दोनच पर्याय होते- सोनम वांगचुक (Sonam Wangchuk Protest)
उपोषण संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, सोनम वांगचुक यांनी घडलेल्या घटनांचा तपशील देणारा एक व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला. यामध्ये सोनम वांगचुक म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत काय झाले, असे तुम्ही विचाराल. पहिली गोष्ट म्हणजे, तो राजीनामा कधी दिला जाईल याबद्दल ते मला कोणतेही आश्वासन देऊ शकले नाहीत. ते म्हणाले की यावर संसदेत नक्कीच चर्चा होईल. उपोषण सुरू ठेवू आणि मरुन जाऊ, असे दोनच पर्याय माझ्याकडे होते. आपण काहीही मिळवलेले नाही, असं नाहीय. माझी विचारसरणी वेगळी आहे. हजारो लोकांनी मला सांगितले की माझे जीवन महत्त्वाचे आहे. मला संघर्ष सुरू ठेवून जिवंत राहायचे आहे, असं सोनम वांगचुक म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही- सोनम वांगचुक (Sonam Wangchuk On Dharmendra Pradhan)
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने आमचे किंवा मुलांचे नुकसान होणार नाही, उलट त्यांचेच नुकसान होईल. जर त्यांनी (धर्मेंद्र प्रधान) राजीनामा दिला असता, तर त्यांचे सर्व नुकसान टळले असते, असं सोनम वांगचुक यांनी सांगितले. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की, आमच्या मुलांवर कोणतेही गुन्हे दाखल होऊ नयेत. आम्ही लडाखमध्ये पाहिले आहे की आयुष्यभरासाठी असलेले एफआयआर भविष्य उद्ध्वस्त करतात. नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असं सोनम वांगचुक म्हणाले. तसेच ढासळत चाललेल्या परीक्षा पद्धतीतील उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर भारतीय संसदेत चर्चा केली जाईल, असे आश्वासन मला सरकार आणि सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांकडून मिळाले आहे, असंही सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलं.
केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या कोणत्या अटी मान्य केल्या? (Which of Sonam Wangchuk demands did the Government accept?)
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह, यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत याची माहिती दिली. जेपी नड्डा यांनी सोनम वांगचुक यांना सरकारचे संपूर्ण आश्वासन वाचून दाखवले. यामध्ये केंद्र सरकारने 3 महत्वाच्या अटी मान्य केल्या.
- 20 जुलै रोजी शांततेने आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही.
- परीक्षेसंदर्भात पेपरफुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
- नीट (NEET) पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल.
