Solapur News: सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडून (BJP) ऑपरेशन लोटसचा (Operation Lotus) दणका विरोधी पक्षांसह मित्र पक्षांना बसण्यास सुरुवात झाली असतानाच शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Faction) ऑपरेशन टायगर (Operation Tiger) सुरू करीत थेट भाजप आमदाराच्या भावालाच गळाला लावले आहे. यामुळे आता सोलापूर (Solapur News) जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे सेना असे चित्र पाहायला मिळू शकणार आहे.
कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी येताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरला ताकद देण्याचे काम केले आहे. सायंकाळी सोलापूरहून पंढरपूरकडे येताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवेढा मार्गे आले. मंगळवेढ्यात भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे व चुलत भाऊ सिद्धेश्वर अवताडे यांच्या कार्यालयात जात शिंदे यांनी सत्कार स्वीकारला. विशेष म्हणजे यावेळी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले काँग्रेसचे भगीरथ भालके हेदेखील उपस्थित होते.
Solapur News: अवताडे शिंदे गटात प्रवेश करणार?
भाजप आमदारांचे चुलते असलेले बबनराव अवताडे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांचे पुत्र हे मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे सभापती आहेत. मंगळवेढामध्ये अवताडे बाप-लेकाची फार मोठी ताकद असून आता थेट एकनाथ शिंदे यांनीच अवताडे यांच्या कार्यालयात जात सत्कार स्वीकारल्याने लवकरच त्यांचा शिवसेना प्रवेश होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Solapur News: उदय सामंतांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगरचे काम सुरु
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात ऑपरेशन लोटसचा दणका सुरू केला असतानाच याला उत्तर म्हणून शिंदेसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू झाले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सध्या ऑपरेशन टायगरचे काम सुरू झाल्याची चर्चा असून अवताडे यांच्याशी उदय सामंत यांच्या बैठका झाल्याची ही माहिती समोर येत आहे. अवताडे यांच्या सत्काराला उपस्थित असणारे भगीरथ भालके हे सध्या काँग्रेसवासी असले तरी शिवसेना प्रवेशाबाबत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
Solapur News: पालकमंत्री जयकुमार गोरे कसा शह देणार?
मात्र आता ऑपरेशन लोटसला ऑपरेशन टायगरने शह देण्याचे काम शिंदे गटाकडून सुरू झाल्यामुळे पंचायत राज निवडणुकीत भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात वेगळे राजकीय समीकरण समोर येऊ शकणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या बेरजेच्या राजकारणाचा फटका भाजपला बसू शकणार असून आमदार समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढणार आहे. आता शिंदे सेनेच्या या डावाला पालकमंत्री जयकुमार गोरे कसा शह देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ
आणखी वाचा