सोलापूर : राज्यातील अनेक नगरापरिषद निवडणुकांच्या (Election) नगराध्यक्षपदाला आणि विविध प्रभागातील नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे. त्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकाला देखील स्थगिती मिळाली आहे. मात्र, या स्थगितीमुळे येथे बिनविरोध झालेल्या निवडीवर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे, नगराध्यक्षपदाची निवड ही बिनविरोधतच होईल, असे दिसून येते. याबाबत, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच, नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी अर्ज बाद ठरलेल्या उमेदवार उज्ज्वला थिटेंना अर्ज दाखल करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आयोगाचे पत्र काल प्राप्त झाले, त्यात असे सांगण्यात आले आहे की, जिथे अपील आहे आणि त्याचा निर्णय 22 नोव्हेंबरपर्यंत झाला तर उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठीचा जो वेळ आहे तो त्यांना मिळतो. पण अनगरबाबतीत जी अपील कोर्टात झाली त्याचा निर्णय आम्हाला 26 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्यामुळे आयोगाच्या सूचनेनुसार चिन्ह वाटप आणि इतर कारवाई करता आली नाही. त्यामुळे आयोगाने सुधारित सूचना आम्हाला काल दिल्या आहेत, अशी माहिती येथील निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.
नव्या सुधारीत कार्यक्रमानुसार 4 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, 10 डिसेंबरपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असेल. जर कोणी माघार घेतली तर आयोगाला तसं कळवलं जाईल. पण, अर्ज माघारी घेतला नाही तर निवडणूक बिनविरोध होईल, असा प्रस्ताव आयोगाला जाईल. त्यानंतर, निवडणूक आयोगाच्या सूचना आल्यानंतर बिनविरोधची घोषणा केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. 10 डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने तोपर्यंत आम्हाला कोणतीही अधिकृत घोषणा करता येतं नाही, असेही तहसीलदार मुळीक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
उज्ज्वला थिटेंना अर्ज भरता येणार नाही
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अर्ज बाद झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध नाही. अनगर नगरपंचायतमध्ये एकमेव अर्ज राहिलेल्या प्राजक्ता पाटील यांना अर्ज माघार घेण्याची संधी मिळेल. जर प्राजक्ता पाटील यांनी उमेदवार अर्ज माघारी घेतला नाही तर निवडणूक आयोगाला केवळ एक अर्ज शिल्लक आहे, असं कळवलं जाईल. त्यानंतर, अनगर बिनविरोधची अधिकृत घोषणा केली जाईल,असेही प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे, येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांची निवड ही बिनविरोधच झाल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, या पदासाठी एकमेव त्यांचा अर्ज दाखल आहे.