नाशिक: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या टीकेनंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे सध्या कन्स्ट्रक्टिव्ह करायला, असे काहीच नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्यात नकारात्मकता भरली आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. मला असं वाटतं, हे बिथरलेल्या लोकांचं लक्षण आहे. त्यांनी माझा जो व्हिडिओ दाखवला तो एका वादविवाद स्पर्धेतील आहे. हा व्हिडिओ दाखवून राज ठाकरे यांना मोठा तीर मारल्यासारखं वाटत असेल. राज ठाकरे यांना वाटतं की, त्यांची बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर जिवापाड श्रद्धा आहे, तर त्यांनी बाळासाहेबांचा अंतिम शब्द जिवापाड जपला पाहिजे. बाळासाहेबांचे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातील शब्द होते की, माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे दाखले देणे राज ठाकरे यांना शोभत नाही. ते फक्त दुसऱ्यांच्या सुपार्या वाजवतात. देवेंद्रजींच्या शब्दात सांगायचं ठरलं तर मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना. या सेनाप्रमुखाची अवस्था किती वाईट आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांनी तुमची अवहेलना केली त्यांच्याच तालावर राज ठाकरे यांना नाचावे लागत आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
त्या व्हिडिओवर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
राज ठाकरे यांना माझा जो 27 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ दाखवला, तो मी नाकारलेला नाही. तो व्हिडिओ वादविवाद स्पर्धेतील आहे. हा व्हिडिओ दाखवून तुम्ही फार मोठा तीर मारलेला नाही. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही शब्द बदलत नाही. राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली आणि त्यांच्यासाठीच सभा घेतली.
ज्या देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीचे अक्षरश: राज ठाकरेंच्या धिंडवडे उडवले, त्यांच्यासमोर राज ठाकरे झुकतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बोलण्याला फार किंमत देण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना सांभाळा तो शब्द न पाळणारे, भाऊ म्हणून असणारं नातं पाळू शकत नाही आणि जो फक्त सुपार्या वाजवतो अशा माणसाला काय किंमत द्यायची, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
आणखी वाचा
पवारांकडून फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात, ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले : राज ठाकरे